दोघे आरोपी अकोल्यातून पोलिसांच्या ताब्यात
बडनेरा डीबी स्क्वॉडची साहिल लॉन प्रकरणात धडक कारवाई

* आरोपीमध्ये एक अल्पवयीन
अमरावती /13 नोव्हेंबर – बडनेरा येथील जुनीबस्तीतील ‘साहील लॉन’ येथे आयोजित आशीर्वाद समारंभात नवरदेवावर चाकूने जीवघेणा हल्ला करून खून करण्याचा प्रयत्न करणार्या दोघा आरोपींना पोलिसांनी अकोल्यातून पकडण्यात यश मिळवले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक जण अल्पवयीन असून दुसर्याचे नाव राघव जितेंद्र बक्षी (रा. माताफैल, बडनेरा) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बडनेरातील माताफैल परिसरातील रहिवासी राम समुद्रे यांच्या दोन मुलांचा – सुजल आणि सोनू समुद्रे यांचा विवाह अंजनगाव सुर्जी येथे पार पडला होता. लग्नानंतर 11 नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास बडनेरातील ‘साहील लॉन’ येथे होते. यादरम्यान, डीजेच्या पैशांवरून पूर्वी झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात ठेवून आरोपी राघव बक्षी याने रंगमंचावर चढून नवरदेव सुजल राम समुद्रे याच्यावर चाकूने सलग तीन वार केले. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे समारंभात एकच खळबळ उडाली. उपस्थित पाहुणे धावपळ करू लागले, तर नवरदेव गंभीर जखमी झाला. हल्ल्यानंतर आरोपी राघव हा बाहेर त्याची वाट पाहत असलेल्या साथीदारासह दुचाकीवरून घटनास्थळावरून पसार झाला. हा संपूर्ण प्रकार लॉनमध्ये लावलेल्या ड्रोन कॅमेरात कैद झाला होता. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी आरोपीच्या घरावर हल्ला चढवून मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली तसेच बाहेर उभी असलेली हिरोहोंडा दुचाकी पेटवून दिली. दुसरीकडे, पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम राबवत या दोन्ही फरार आरोपींचा माग काढला. बडनेरा पोलिसांच्या डीबी स्क्वॉडच्या पथकाने बुधवारी उशिरा रात्री अकोल्यात धडक देत दोघांनाही अटक केली. त्यांना बडनेरा येथे आणण्यात आले असून, आज न्यायालयात हजर करून पोलिस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे. या यशस्वी कारवाईमुळे बडनेरा परिसरात पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक व्यक्त केले जात आहे.




