जुळ्या शहरात स्टंटबाजांचा धुमाकूळ

नागरिक त्रस्त, पोलिस प्रशासन गप्प

परतवाडा /13 नोव्हेंबर – अचलपूर-परतवाडा शहरात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच रात्रीच्या वेळेत काही तरुणांकडून रेसिंग बाईकवरून स्टंटबाजी करून धुमाकूळ घातला जात आहे. शहरातील प्रमुख चौक आणि रस्त्यांवर गेल्या सात-आठ दिवसांपासून सुरू असलेल्या या धोकादायक प्रकारामुळे नागरिकांच्या तक्रारींना ऊत आला आहे.
संध्याकाळी साधारण 10 ते 11.30 या वेळेत तहसील चौक, विदर्भ मिल कॉलनी, बसस्थानक, जयस्तंभ चौक,लालपुल ,चिखलदरा रोड, धारणी रस्ता ,अचलपूर रोडवरील कॉटन मार्केट, परतवाडा अचलपूर मार्ग, देवडी चौक ,दुल्हा गेट ,गांधी पूल ,हरम रोड,खिडकी गेट व रेल्वे स्टेशन परिसरात हे स्टंटबाज सुसाट वेगाने बाईक चालवताना दिसतात. साक्षीदारांच्या मते, हे युवक केवळ दहा सेकंदांत 100 ते 110 किमी प्रतितास वेगाने बाईक चालवतात. त्यांच्या बाईकचा कर्णकर्कश आवाज आवाज नियमांच्या मर्यादेपेक्षा दुपटीने जास्त असून, तो आवाज शहरभर घुमतो.या प्रचंड आवाजामुळे परिसरातील रुग्णालयांतील रुग्ण तसेच हृदयविकाराने त्रस्त नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत असल्याचे समजते. काही रुग्णालयांनी याविषयी तक्रारीही दाखल केल्याची माहिती मिळाली आहे. शहरातील नागरिकांचा आरोप आहे की, पोलिस प्रशासनाकडून या स्टंटबाजांवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. एखाद्या चित्रपटातील दृश्यांसारखी स्टंटबाजी शहरभर सुरू आहे. पण पोलीस हातावर हात धरून बसले आहेत, अशी नाराजी नागरिकांनी व्यक्त केली. काही नागरिकांच्या मते, हे युवक चित्रपटातील चोरीसारख्या प्रसंगांचा सराव करत नाहीत ना, असा संशयही व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकारामागे काही गुन्हेगारी हेतू असल्याचीही भीती लोकांमध्ये पसरली आहे.
अचलपूर- परतवाडा शहरातील महिला व ज्येष्ठ नागरिकांनी पोलिस प्रशासनाकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. रात्रीच्या वेळेत गस्त वाढवून अशा स्टंटबाजांवर कडक कारवाई करावी, अन्यथा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, अशी विनंती नागरिकांकडून करण्यात आली आहे.
नागरिकांची मागणी -रात्रीच्या वेळेत पोलिस गस्त वाढवावी, स्टंटबाजांविरोधात कारवाई करून बाईक जप्त कराव्यात, आवाज नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई व्हावी, सार्वजनिक ठिकाणी ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात.

संबंधित बातम्या

Back to top button