क्रिकेट बुकीकडून महिलेचा छळ
राजापेठ पोलिसांकडून विनयभंगाचा गुन्हा दाखल

अमरावती /10 नोव्हेंबर – राजापेठ पोलिस स्टेशन परिसरात राहणार्या एका महिलेचा सतत छळ केल्याप्रकरणी क्रिकेट बुकी राजकुमार बागडीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने तिला रस्त्यात अडवून जबरदस्तीने बोलण्याचा प्रयत्न केला आणि नकार दिल्यावर जीवे मारण्याची तसेच बदनामीची धमकी दिली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. वृत्तानुसार, पीडित महिला आपल्या कुटुंबासह राजापेठ परिसरात राहते आणि कपड्यांचे दुकान चालवते. तिचा पती आजारी असल्याने घराची संपूर्ण जबाबदारी तिच्यावर आहे. गेल्या तीन महिन्यांपासून क्रिकेट बुकी राजकुमार बागडी तिच्याशी बोलण्यासाठी वारंवार फोन करत होता आणि दबाव आणत होता, मात्र तिने प्रतिसाद दिला नाही. दरम्यान, तिचा पती उपचारासाठी रुग्णालयात असताना बागडी तिच्या घरात घुसला आणि जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने आरडाओरड केल्याने तो शिवीगाळ करून पळून गेला. त्यानंतरही तो तिचा सतत पाठलाग करत राहिला आणि तिच्या दुकानात जाऊन त्रास देत राहिला. पतीने याला विरोध केल्यावर बागडीने त्यालाही जीवे मारण्याची धमकी दिली. अखेरीस 25 ऑक्टोबर रोजी रात्री आठच्या सुमारास महिला बाजारातून दुचाकीवरून घरी परतत असताना, सातुर्ना परिसरातील मुंधडा गॅरेजजवळ बागडीने तिला अडवून बोलण्याचा प्रयत्न केला. महिलेने नकार दिल्यावर त्याने तिला शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर घाबरलेल्या महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. राजापेठ पोलिसांनी या प्रकरणात विनयभंगाचा गुन्हा नोंदवून आरोपी राजकुमार बागडीचा शोध सुरू केला आहे.




