पटेल नगरात दोन घरफोड्या

219 ग्रॅम सोने व 2.57 लाख रुपये रोख रक्कम चोरीला

अमरावती /10 नोव्हेंबर बडनेरा परिसरातील सरदार पटेल नगर, साई नगर संकुलात एका अज्ञात चोरट्याने दोन घरांमध्ये घुसून तब्बल 219 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि दोन लाख 57 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या दोन्ही घरफोड्या 8 नोव्हेंबर रोजी समोर आल्या असून शनिवारी रात्री बडनेरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चोरीला गेलेल्या सोन्याचे बाजारमूल्य सुमारे 27 लाख 37 हजार रुपये इतके असल्याचे समोर आले असले तरी पोलिस पंचनाम्यात त्याची किंमत 6 लाख 78 हजार रुपये नमूद करण्यात आली आहे. या प्रकरणी पंकज दिगंबर दखणे (वय 34) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकज दखणे हे आपल्या नवीन घराच्या बांधकामादरम्यान दोन दिवसांसाठी मंगलधाम कॉलनीत वास्तव्यास होते. 7 नोव्हेंबर रोजी त्यांनी सरदार पटेल नगरमधील त्यांच्या जुन्या घरात जाऊन दागिने कपाटात ठेवले आणि पुन्हा मंगलधाम कॉलनीत परतले. दुसर्‍या दिवशी म्हणजे 8 नोव्हेंबर रोजी एका शेजार्‍याने फोन करून घरात चोरी झाल्याची माहिती दिली. ते तात्काळ घरी पोहोचले असता घरातील कपाट फोडलेले दिसले. तपासणी केली असता अंदाजे 195 ग्रॅम सोन्याचे दागिने, चांदीची लक्ष्मीची मूर्ती आणि दोन लाख पन्नास हजार रुपये रोख रक्कम चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले. चोरट्यांनी मंगळसूत्राचा पट्टा, मंगळसूत्राचा हार आणि एक साखळी देखील लंपास केली होती. घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलिस ठाण्याचे स्टेशन हाऊस ऑफिसर सुनील चव्हाण यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. श्वानपथक आणि फिंगरप्रिंट तज्ञांची मदत घेण्यात आली; मात्र अद्याप चोरट्यांचा कोणताही ठोस सुगावा लागलेला नाही. दरम्यान, दखणे यांच्या शेजारी दिलीप चव्हाण (वय 56) यांच्या घरातही त्याच रात्री चोरी झाल्याचे समोर आले आहे. चव्हाण कुटुंब 7 नोव्हेंबर रोजी तीर्थयात्रेसाठी शेगाव येथे गेले होते आणि 8 नोव्हेंबर रोजी परतले. या कालावधीत रात्री 11 ते दुसर्‍या दिवशी सकाळदरम्यान त्यांच्या घरात चोरी झाली. चोरट्याने त्यांच्या घरातून 24 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि सात हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली. या प्रकरणीही बडनेरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोन्ही घटनांचा तपास सुरू आहे.

संबंधित बातम्या

Back to top button