संकट मोचन हनुमान मंदिरात विटंबना

बडनेरा परिसरात तणावाचे वातावरण

* अज्ञात समाजकंटकांनी मंदिरात घाण करून धार्मिक वस्तूंची केली तोडफोड

* पोलिसांकडून तपास सुरू; नागरिकांत संतापाची लाट

अमरावती /10 नोव्हेंबर बडनेरा रेल्वे स्थानक परिसरातील जुन्या बुकिंग ऑफिसच्या मागे असलेल्या संकट मोचन हनुमान मंदिरात अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिक व भक्तांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 9 नोव्हेंबरच्या मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी मंदिर परिसरात घाण करून, काही धार्मिक वस्तूंची तोडफोड केली. त्यामुळे मूर्तीची विटंबना झाल्याचे सकाळी दर्शनाला आलेल्या भक्तांच्या लक्षात आले. ही बाब कळताच मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमा झाले आणि त्यांनी रोष व्यक्त केला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांनी ताफ्यासह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. रेल्वे प्रशासन, जीआरपी आणि रेल्वे पोलीस दल यांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. सध्या पोलिसांनी अज्ञात आरोपींचा शोध सुरू केला असून, सीसीटीव्ही फूटेज तपासण्याचे काम सुरू आहे. संकट मोचन हनुमान मंदिर हे बडनेरा परिसरातील जुने आणि लोकप्रिय धार्मिक स्थळ असून, येथे दरवर्षी हनुमान जयंती, रामनवमी तसेच विविध धार्मिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. त्यामुळे या विटंबनेच्या घटनेने भक्तांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. दरम्यान, भाजपचे जिल्हा सचिव प्रदीप सोळंके यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. दोषींना तात्काळ अटक न झाल्यास आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. या वेळी गोलू भारती, मिश्रा तसेच अनेक नागरिक घटनास्थळी उपस्थित होते. वृत्त लिहीपर्यंत पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरू होता. दरम्यान, नागरिकांकडून असा प्रश्न उपस्थित केला जात आहे की, रेल्वे प्रशासनाच्या हद्दीत असलेले मंदिरच सुरक्षित नसेल, तर प्रवासी आणि रेल्वे मालमत्तेचे संरक्षण कितपत सुरक्षित आहे?

संबंधित बातम्या

Back to top button