बीएसएनएलच्या कर्मचार्‍याचे सोंग घेऊन जेसीबीने केबल चोरीचा प्रयत्न

पोलिसांनी एका चोरट्याला पकडले, 27 लाखांचा माल जप्त

अमरावती /10 नोव्हेंबर – शहरातील चोरट्यांच्या धाडसाने आता सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. घरफोड्या आणि वाहनचोरीनंतर आता चोरटे थेट बीएसएनएलच्या कर्मचार्‍याचे सोंग घेऊन जेसीबीने भूमिगत केबल चोरण्याच्या धाडसी प्रयत्नात उतरले! कोतवाली परिसरातील ज्ञानमाता स्कूलजवळ मध्यरात्री घडलेल्या या सिनेस्टाइल प्रकाराने पोलिसही चकित झाले.
बीएसएनएलचे उपविभागीय अभियंता प्रजशील तुकाराम दहीवाडे (वय 46) यांच्या वेळीच दिलेल्या माहितीमुळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत एका चोरट्याला रंगेहात पकडले, तर त्याचे पाच-सहा साथीदार अंधाराचा फायदा घेत पसार झाले. पोलिसांनी आरोपी कडून जेसीबीसह तब्बल 27 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शनिवारच्या मध्यरात्री अभियंता दहीवाडे यांचे सहकारी फैजुर रहमान यांनी फोन करून विचारले की, ज्ञानमाता स्कूलजवळ बीएसएनएलचे काही काम सुरू आहे का? दहीवाडे यांनी स्पष्ट सांगितले की त्या भागात कोणतेही अधिकृत काम सुरू नाही. त्यांना संशय आला की कुणीतरी केबल चोरी करत असावे. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता डायल-112 वर पोलिसांना कळवले आणि वरिष्ठ अधिकारी सहायक महाप्रबंधक देवनाथ हरिराम भड यांनाही माहिती दिली. दरम्यान, दहीवाडे स्वतः घटनास्थळी पोहोचले तेव्हा पोलिस आधीच हजर होते. तेथे एमएच 27 डीयू 9050 क्रमांकाची जेसीबी उभी होती. भूमिगत डक्टमधून 500 मीटर लांबीची, 400 पेअरची कॉपर केबल (किंमत सुमारे 7 लाख) जमिनीवर काढून ठेवण्यात आली होती. पोलिसांनी घटनास्थळी एक युवक पकडला. त्याने चौकशीत आपले नाव शेख अयास शेख गयास (वय 26, रा. लक्ष्मीनगर, नवी दिल्ली) असे सांगितले. त्याने कबूल केले की तो आणखी 5-6 साथीदारांसह केबल चोरीस आला होता, मात्र पोलिसांना पाहून इतर सर्व पसार झाले. अभियंता दहीवाडे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून, जेसीबीसह एकूण 27 लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे. फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांकडून सापळा रचला जात आहे.

संबंधित बातम्या

Back to top button