अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
रामपुरी कॅम्प परिसरात शोककळा

अमरावती /10 नोव्हेंबर – अमरावती शहरातील शेगाव नाका रस्त्यावर 28 ऑक्टोबरच्या रात्री झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला होता. त्याच अपघातात गंभीर जखमी झालेला सुमित नेभाणी (रा. कृष्णा नगर) गेल्या बारा दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होता. मात्र, रविवारी (9 नोव्हेंबर) उपचारादरम्यान त्याने अखेर प्राण सोडले. या घटनेने रामपुरी कॅम्प परिसरावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 28 ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास सुमित नेभाणी आणि त्याचा मित्र साहिल गुलशनकुमार मनसुखानी हे दोघे मोटारसायकलवरून शेगाव नाका चौकातून जात होते. त्यावेळी क्रमांक चक 27-ठ 7689 असलेली भरधाव कार त्यांच्यावर आदळली. धडकेचा जोर इतका होता की दोघेही मोटारसायकलवरून दूर फेकले गेले आणि कारही घटनास्थळीच उलटली. या भीषण अपघातात साहिल मनसुखानी यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर सुमित गंभीर जखमी अवस्थेत खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. गेल्या बारा दिवसांपासून तो मृत्यूशी झुंज देत होता; मात्र अखेर रविवारी सकाळी त्यानेही अखेरचा श्वास घेतला. विलक्षण योगायोग म्हणजे, अपघाताच्या दिवशीच सुमित नेभाणीचा वाढदिवस होता. आनंदात साजरा होत असलेला दिवस क्षणात दुःखद आठवण बनला. तरुण वयात झालेल्या या दुर्दैवी मृत्यूमुळे मित्रपरिवार, नातेवाईक आणि स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.




