आज मनपाची कचरा संकलन व वाहतुकीची निविदा उघडणार का?
आर अँड बी इन्फ्राचा आरोप, तिन्ही कंपन्यांच्या तांत्रिक पात्रतेची तपासणी

अमरावती /9 नोव्हेंबर – अमरावती महानगरपालिकेच्या तब्बल 245 कोटी रुपयांच्या कचरा संकलन आणि वाहतूक ठेक्याच्या निविदा प्रक्रियेचा निर्णायक टप्पा आज गाठला जाणार आहे.
मनपाने आज (10 नोव्हेंबर) फाइनेंशियल बिड उघडण्याची तारीख निश्चित केली असली, तरी आर अँड बी इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रा.लि. या कंपनीने उर्वरित तीन कंपन्यांच्या तांत्रिक पात्रतेवर गंभीर आक्षेप घेतल्याने ही प्रक्रिया स्थगित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या ठेक्यासाठी चार कंपन्यांनी निविदा दाखल केल्या होत्या – पी. गोपीनाथ रेड्डी कंपनी, अर्बन एनवायरो वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड, कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि आर अँड बी इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रा. लि. मनपाच्या स्क्रुटिनी समितीने तांत्रिक छाननीनंतर आर अँड बी इन्फ्राला अपात्र ठरविले, तर उर्वरित तीन कंपन्यांना फाइनेंशियल बिडसाठी पात्र घोषित केले. मात्र, स्पर्धेबाहेर गेलेल्या आर अँड बी इन्फ्राने मनपा आयुक्तांकडे दोन पानी पत्र सादर करून या तिन्ही कंपन्यांच्या टेक्निकल बिडमधील त्रुटींवर आक्षेप घेतले आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, अर्बन एनवायरोकडे निविदेप्रमाणे 12 नवीन आणि मोठे कॉम्पेक्टर नाहीत, कोणार्क इन्फ्राकडे कचरा संकलनाचा सात वर्षांचा अनुभव नाही, तर पी. गोपीनाथ रेड्डी कंपनीने पॉवर ऑफ अटर्नीचे आवश्यक दस्तावेज सादर केलेले नाहीत. आर अँड बी इन्फ्राने मनपाला या तिन्ही कंपन्यांच्या तांत्रिक पात्रतेची पुन्हा तपासणी करून त्याचा अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पात्र ठरलेल्या पी. गोपीनाथ रेड्डी कंपनीनेदेखील इतर कंपन्यांविषयी हरकती नोंदवल्याचे समजते. त्यामुळे निविदा प्रक्रियेत तांत्रिक पेच निर्माण झाला आहे. मनपा प्रशासनाने संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तथापि, आर अँड बी इन्फ्राच्या आक्षेपांच्या पार्श्वभूमीवर फाइनेंशियल बिड आज नियोजितप्रमाणे उघडली जाईल का, की तपासणी पूर्ण होईपर्यंत प्रक्रिया थांबवली जाईल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. शहरातील सफाई व्यवस्थेचा पुढील कारभार कोणत्या कंपनीकडे सोपवला जाणार, याचा निर्णय आता मनपाच्या पुढील पावलावर अवलंबून राहणार आहे.




