30 नोव्हेंबरला थांबणार नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकीचा प्रचार

अमरावती / 7 नोव्हेंबर – नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार प्रत्यक्ष मतदान संपण्याच्या 48 तास आधी सर्व प्रकारचा प्रचार थांबवणे बंधनकारक आहे. त्यामुळे 2 डिसेंबरला सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार असल्याने 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता प्रचार संपुष्टात येणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 10 ते 17 नोव्हेंबर दरम्यान नामांकन स्वीकारले जाणार आहे. 18 नोव्हेंबरला नामांकन पत्रांची छाननी होईल. 21 नोव्हेंबरपर्यंत उमेदवार अर्ज मागे घेऊ शकतील, तर काही विशेष प्रकरणांमध्ये 25 नोव्हेंबरपर्यंतही अर्ज मागे घेण्याची मुभा राहील. त्यामुळे प्रत्यक्ष प्रचारासाठी उमेदवारांना फारसा वेळ मिळणार नाही. इच्छुकांनी आधीपासूनच मतदारांशी भेटीगाठी व जनसंपर्क वाढवण्यावर भर द्यावा, असा सल्ला दिला जात आहे. प्रचाराच्या काळात धार्मिक स्थळांचा उपयोग, धर्म-जातीय सभा घेणे, अशा कोणत्याही प्रकारच्या संवेदनशील कृतींवर बंदी आहे. आचारसंहितेच्या काळात शासन व अर्ध-शासकीय संस्थांमध्ये तात्पुरती किंवा करारावरची भरती करता येणार नाही. तसेच आचारसंहिता लागू होण्यापूर्वी परीक्षांचे मुलाखत किंवा प्रक्रिया पूर्ण झालेली असली तरी निकाल जाहीर करता येणार नाही. प्रचार कालावधी संपल्यानंतर वॉट्सअॅप, फेसबुक, एक्ससारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरूनही प्रचार करता येणार नाही. निवडणुकीत प्राणी किंवा पक्ष्यांचा प्रचारासाठी वापर करण्यास संपूर्ण बंदी आहे. मतदान प्रतिनिधी नेमताना तो प्रभागाचा रहिवासी असणे आवश्यक असून, त्यांच्या नावांची माहिती मतदानाच्या 24 तास आधी देणे बंधनकारक आहे.
नगरसेवक पदासाठी इच्छुकांची वाढती लगबग- अमरावती जिल्ह्यातील 10 नगर परिषद व 2 नगर पंचायतांमध्ये निवडणुका होत असल्याने एकीकडे प्रशासन तयारीत गुंतले असतानाच राजकीय हालचालीही जोरात सुरू आहेत. नगरसेवक पदासाठी इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून पूर्वीचे नगरसेवक, नवखे चेहरे आणि विविध पक्षांचे कार्यकर्ते जोरदार तयारीत आहेत. नऊ वर्षांनी निवडणुका होत असल्याने तिकीटासाठी लॉबिंग, प्रचारनियोजन, खर्चाची तरतूद, कार्यकर्त्यांचे सक्रीय होणे याला वेग आला आहे. प्रभागरचना आणि आरक्षण निश्चिती पूर्ण झाल्यानंतर 4 नोव्हेंबरला निवडणूक घोषणा होताच सर्व इच्छुकांनी प्रचार तयारीचा जोर वाढविला आहे. नगरसेवक पदामुळे मिळणारा सन्मान, प्रतिष्ठा आणि विकासकामांची संधी यामुळे इच्छुकांमध्ये तीव्र उत्सुकता आणि स्पर्धा दिसत आहे.




