भाजप नेते विजयराज शिंदेंनी विधानसभेत आघाडीकडून एक कोटी घेतले
भाजपचे अनंता शिंदे यांचा गंभीर आरोप

बुलढाणा /6 नोव्हेंबर : नगरपालिका निवडणुकांची घोषणा झाल्यावर दुसर्याच दिवशी आज गुरुवारी नाट्यमय आणि धक्कादायक राजकीय घडामोडी घडल्या. भाजपचे जिल्हा सचिव अनंता शिंदे यांनी आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेतला.
एवढ्यावरच न थांबता त्यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी गत विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री शेळके यांच्या कडून ‘आलेली’ 1 कोटी रुपयांची रक्कम घेत युतीच्या उमेदवाराच्या विरोधात काम केले. एक कोटीपैकी दहा ते पंधरा टक्के रक्कम काही जवळच्या (भाजप) पदाधिकार्यामध्ये वाटण्यात आली. त्यात मी सुद्धा एक लाखाचे वाटेकरी असल्याचा धक्कादायक आरोप अनंता शिंदे करून धमाल उडवून दिली. नगर पालिका निवडणुका जाहीर झाल्या असताना हे आरोप करण्यात आले. यामुळे महायुतीसह शहराच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. भाजप बुलढाणा शहर सचिव, अध्यक्ष आणि अलीकडेच जिल्हा सचिव म्हणून कार्यरत अनंता शिंदे यांची जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते अशी ओळख आहे. मात्र, त्यांनी आज शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या संपर्क कार्यालयात पत्र परिषद घेतली. यावेळी त्यांनी विधानसभेत जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी आघाडीच्या उमेदवार जयश्री शेळके यांच्या कडून आलेली 1 कोटी रुपयांची बॅग स्वीकारली असा आरोप केला. त्यांनी लोकसभा निवडणुकीत देखील तडजोड केली. तसेच विधानसभा निवडणुकात युतीचे उमेदवार संजय गायकवाड आणो लोकसभेत प्रतापराव जाधव यांच्या विरोधात काम केले असा आरोप केला. दरम्यान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी नवे प्रवेशित अनंता शिंदे यांच्या आरोपांचे समर्थन केले. ते म्हणाले, की विधानसभा निवडणुकीत भाजपा बुलढाणा लोकसभा प्रमुख विजयराज शिंदे व काही पदाधिकार्यांनी आघाडी कडून 5 कोटी घेऊन आपल्या विरोधात काम केले. अशी लेखी तक्रार आपण प्रदेश भाजप ते दिल्लीतील भाजप नेत्यांकडे केली होती. त्यावर काही कारवाई करण्याऐवजी शिंदेना भाजप जिल्हाध्यक्ष करून प्रमोशन देण्यात आले.




