रात्रीचा गारवा वाढला ः तापमान 17 अंशांवर येताच हिवाळ्याची गुलाबी थंडी

अमरावती /6 नोव्हेंबर अमरावती शहरात आज पहाटेच हिवाळ्याची एक हलकी, सुखद जाणीव झाली. रात्रीभर मंद थंडगार हवा वाहत राहिली आणि सकाळी तापमान 17 अंशांवर येताच लोकांनी उबदार कपड्यांची साथ घेत दिवसाची सुरुवात केली. नोव्हेंबरच्या सुरूवातीपासून हवेतला गारवा हळूहळू वाढत असून पुढील दोन दिवसांत रात्रीचे तापमान 16 अंशांवर जाण्याची शक्यता हवामान संस्थेने व्यक्त केली आहे. दिवसाचे तापमान मात्र 32-33 अंशांदरम्यानच स्थिर आहे. हवामान विभागाने सांगितले की 15 नोव्हेंबरनंतर या परिसरात थंडी थोडी अधिक जाणवेल. अमरावती, अकोला आणि वाशीम जिल्ह्यांतही रात्रीचा पारा 18-19 अंशांपर्यंत खाली आला असून तो पुढील दिवसांत आणखी थोडा घसरण्याची अपेक्षा आहे. दिवाळी उत्सवानंतर शहरातील बाजारपेठांची रंगत बदलू लागली आहे. चौकाचौकांत गरम कपड्यांची दुकाने सजायला लागली असून स्वेटर, टोपी, हातमोजे आणि छोट्यांसाठी पायमोज्यांची खरेदी सुरू झाली आहे. सकाळच्या सौम्य थंडीचा अनुभव घेत नागरिक आता हिवाळ्यासाठी आवश्यक तयारी करताना दिसत आहेत. नोव्हेंबर ते जानेवारी हा काळ आरोग्यासाठी अनुकूल मानला जातो. सकाळच्या शांत, हलक्या थंड वातावरणात फेरफटका मारण्यासाठी अनेकजण बाहेर पडत आहेत. बगीचे आणि मैदानांत मॉर्निंग वॉक करणार्‍यांची संख्या वाढली असून हवेत एक आनंददायी चैतन्य जाणवत आहे. बाजारात ताज्या भाज्या आणि हिरव्या पालेभाज्यांचीही मुबलक उपलब्धता असून अनेकजण आपला रोजचा आहार अधिक आरोग्यदायी बनवत आहेत. थंडीबरोबरच काही काळजी घ्यावी लागते, असे डॉक्टरांचे मत आहे. अचानक थंड हवेमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो, म्हणून वृद्ध आणि हृदयविकाराच्या रुग्णांनी थंडीपासून स्वतःचे संरक्षण करावे, उबदार कपडे घालावेत आणि गरज भासल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अमरावतीत नुकत्याच सुरू झालेल्या या सौम्य थंडीने नागरिकांना हिवाळ्याच्या आनंददायी दिवसांची हलकीशी चाहूल मात्र दिली आहे.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button