डीपी रोडवर झोपडपट्टीचे साम्राज्य; अवैध धंद्यांचा अड्डा फोफावला
मनपा कर्मचार्यांवर संगनमताचे आरोप

अमरावती /6 नोव्हेंबर – जुनीवस्ती बडनेरामधील तिरुपति व संजीवनी कॉलनीमार्गे पवारवाडीला जाणार्या 18 मीटर डीपी रोडवर अतिक्रमणाचा ‘महागड्या’ प्रकल्पासारखा विस्तार होत असून, रातोरात उभ्या राहिलेल्या झोपड्यांनी रस्ताच गिळंकृत केला आहे. या झोपड्यांत आता असामाजिक घटकांची दादागिरी आणि अवैध धंद्यांचा उघडपणे धुमाकूळ सुरू असून, परिसरवासीयांनी मनपा आयुक्तांकडे थेट अधिकारीच संरक्षण देत आहेत. असा स्फोटक आरोप केला आहे. परिसरातील नागरिकांचे म्हणणे धक्कादायक आहे-अतिक्रमण अवैध झोपड्या अवैध धंदे अवैध पण त्यांना मात्र विद्युत कनेक्शन कायदेशीर! हेच सर्वात मोठे पुरावे कोणाच्या आशीर्वादाचे? निवेदनानुसार, सर्व्हे क्र. 133, 134 व 140 मधील डीपी रोडसाठी राखून ठेवलेल्या जागेवर काही लोकांनी खुलेआम कब्जा करून झोपड्या उभारल्या. दिवसा शांत तर रात्री या झोपड्यांचा दुसराच चेहरा-सट्टेबाजी, अंधारात चालणारे व्यवसाय, आणि असामाजिक घटकांचे अड्डे. महिलांना, विद्यार्थ्यांना आणि सामान्य नागरिकांना या मार्गावरून जाणे म्हणजे जणू ‘धोक्याचा शॉर्टकट’ बनले आहे. परिसरवासीयांनी अनेकवेळा बडनेरा झोनकडे तक्रारी केल्या, पण कारवाईऐवजी शांतता. काही अधिकार्यांची साथ नसती, तर अवैध झोपड्यांना लगेच पाडले गेले असते उलट इथे तर वीज कनेक्शन देऊन त्यांना कायदेशीर मान्यता देण्याचा प्रयत्न केला जातोय, असा रोष नागरिकांनी व्यक्त केला. अतिक्रमणामुळे संपूर्ण 18 मीटरचा रस्ता बधिरावस्थेत असून, दोन्ही बाजूंनी अवैध झोपड्यांनी मार्गच संकुचित झाला आहे. संध्याकाळी परिस्थिती एवढी बिकट होते की, परिसरातील नागरिक रस्त्याच्या या भागाला अमरावतीचा मिनी क्राइम पॉकेट म्हणू लागले आहेत. नागरिकांची स्पष्ट मागणी -डीपी रोडवरील अतिक्रमण तत्काळ हटवा; परिसरातील अवैध धंदे बंद करा; आणि या प्रकरणात सामील असलेल्या मनपा कर्मचार्यांवर चौकशी करा. निवेदन देताना मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते, त्यात तुषार माहोरे, सुभाष पेठकर, आरती पेठकर, विलास पेठकर, सविता पेटले, अशोक कावरे, उषा कावरे, संजय पेठकर, शिल्पा पेठकर, कैलाश ठाकरे, मांगीलाल पटेल, रुपेश कैकाडे, रंजना बदकुले, प्रकाश बदकुले, मनोहर निकोसे, प्रकाश पवार, सरिता कैकाडे, संजय यादव, नकूल वैरागडे, प्रल्हाद वैरागडे, आकाश अंभोरे, नितिन कुरवाडे, सचिन भलावी, सुधाकर सुने, सतीश बांडाबूचे, ओमप्रकाश लेंडे, एन.आर. बांडाबूचे, ए.आर. लेंडे आदी नागरिकांचा समावेश आहे.




