उद्या पालकमंत्री बावनकुळे मेळघाट दौर्यावर
चिखलदरा-धारणीसह दर्यापूर, अंजनगाव भेट

चिखलदरा 6 नोव्हेंबर – आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे 8 नोव्हेंबर रोजी चिखलदरा, धारणी, दर्यापूर आणि अंजनगाव सुर्जी या भागांच्या दौर्यावर येत आहेत. निवडणुकीचे नियोजन, पक्षीय संवाद आणि स्थानिक राजकीय समीकरणांचा आढावा घेण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे.
पालकमंत्री सकाळी 11 वाजता हेलिकॉप्टरने चिखलदर्यात उतरतील.दौर्याच्या तयारीसाठी 4 नोव्हेंबर रोजी सर्किट हाऊस मध्ये बैठक घेण्यात आली. जिलाध्यक्ष प्रभु दास भिला वेकर यांनी बुधवारी प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक तयारीचा आढावा घेतला. धारणी नगर पंचायत निवडणुकीसंदर्भातही याच दिवशी भाजप कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. दर्यापूर आणि अंजनगाव सुजीर्र् येथील निवडणुका जाहीर झाल्यामुळे भाजपकडून स्थानिक पातळीवरील रणनीती ठरवण्यासाठी स्वतंत्र बैठकांचे आयोजन सुरू आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांचा दौरा अधिक महत्त्वाचा मानला जात आहे. दरम्यान, चिखलदर्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजीत पवार गट) व भाजप युतीची चर्चा सुरू असून स्थानिक राजकारणात या संभाव्य समीकरणामुळे उलथापालथ होऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. मतविभाजनाचा धोका, कमी मतदार संख्या आणि उमेदवारांची क्षमता लक्षात घेता हे दोन्ही पक्ष तालमेल साधण्याच्या चर्चेत असल्याचेही समजते. भाजपकडून शिवमंदिर आणि शिवनंदन हॉटेल परिसरात हेलिपॅडसाठी जागेची पाहणी झाल्याची माहिती आहे. मात्र पोलिस प्रशासनाला अद्याप अधिकृत दौर्याची माहिती मिळालेली नाही, अशीही चर्चा आहे. चिखलदरा नगरपालिकेत नगराध्यक्षपदाची थेट निवडणूक होत असल्याने दावेदारांची संख्या मोठी आहे. मागील निवडणुकीत पूजा आशीष चौबे यांना उमेदवारी देण्यात आली होती. यंदा रूपेश चौबे यांच्या नावाची चर्चा सुरू असून भाजप अंतिम उमेदवार कोणाला देते, याकडे लक्ष लागले आहे. पालकमंत्री बावनकुळे यांच्या दौर्यासोबत डॉ. अनिल बोंडे आणि भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या भेटीतून भाजप-राष्ट्रवादी युतीचा काही संकेत मिळतो का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.




