सिंधी समाजाचा एकजुटीचा ज्वालामुखी

इर्विन चौकात जोरदार घोषणाबाजी

* अमित बघेलविरुद्ध कडक कारवाईची मागणी

* अखंड भारताचे साक्षीदार, कर्मयोगी सिंधी

अमरावती/ 4 नोव्हेंबर – छत्तीसगडच्या अमित बघेलने सिंधी समाजाचा अवमान केल्याच्या निषेधार्थ अमरावतीतील सिंधी समाज आज अभूतपूर्व एकतेने रस्त्यावर उतरला. शहरातील सर्व सिंधी व्यापार्‍यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून इर्विन चौकात भव्य आंदोलन छेडले. ‘अमित बघेलला फाशी द्या’, ‘अखंड भारताचे साक्षीदार बना’, ‘कर्मयोगी सिंधी अमर राहो’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ झालेल्या या आंदोलनात हजारोंच्या संख्येने सिंधी बांधवांनी हजेरी लावली. समाजातील तरुणांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकजण हातात फलक आणि राष्ट्रध्वज घेऊन घोषणाबाजी करत होता. वातावरण देशभक्तीच्या जोशाने भरून गेले होते. आंदोलनाची सांगता देव झुलेलाल यांच्या सामूहिक पूजा-अर्चनेने करण्यात आली. सिंधी समाजाच्या या निषेधातून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना निवेदन पाठवून अमित बघेलवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. सिंधी समाजाचा अपमान म्हणजे भारतमातेचा अपमान, असे वक्ते म्हणाले. या आंदोलनात रामपुरी कॅम्प, कंवर नगर, दस्तूर नगर, बडनेरा तसेच इतर परिसरांतील सिंधी पंचायती व संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संत साई राजेशलाल कंवर, पूज्य संत डॉ. संतोष महाराज, डॉ. इंद्रलाल गेमनानी, संतोष सबलानी, इंद्रलाल पुरसानी, अनूप कपूर, राजकुमार दुर्गाई, नानक रोटी, मुकेश हरवानी, सुनील पमनानी, वासुदेव कृष्णानी, पूरनलाल हबलानी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रत्येक पदाधिकार्‍यांच्या भाषणातून संताप आणि स्वाभिमान दोन्ही झळकत होते. आम्हाला सिंधी असल्याचा, हिंदू असल्याचा आणि भारतीय असल्याचा अभिमान आहे. आमच्या धर्म, संस्कृती आणि मातृभूमीचा अवमान आम्ही सहन करणार नाही, असे ते ठामपणे म्हणाले.
व्यापार्‍यांचा बंद शंभर टक्के यशस्वी-शहरातील बिझीलॅन्ड, ड्रीमलॅन्ड, सिटीलॅन्डसह प्रमुख कापड बाजारपेठांतील सर्व प्रतिष्ठाने सकाळपासून दुपारी 1 वाजेपर्यंत बंद राहिली. दुपारनंतर दुकाने सुरू होताच व्यापार पूर्ववत झाला. समाजाच्या या शिस्तबद्ध बंदचे सर्वत्र कौतुक झाले.

संबंधित बातम्या

Back to top button