महानगरपालिकेच्या सर्वात मोठ्या स्वच्छता कंत्राटाचा निर्णय अंतिम टप्प्यात

चारही निविदाधारकांना सादरीकरणासाठी आमंत्रण

* तांत्रिक बोली लिफाफे उघडले

अमरावती/ 4 नोव्हेंबर – अमरावती महानगरपालिकेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या स्वच्छता कंत्राटाचा निर्णय आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे.
शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी महापालिकेने जाहीर केलेल्या एकत्रित कचरा संकलन व वाहतूक कंत्राटाबाबत वरिष्ठ अधिकार्यांच्या छाननी समितीची बैठक सोमवारी संध्याकाळी पार पडली. बैठकीनंतर त्वरित, चारही पात्र निविदाधारकांना मंगळवारी (5 नोव्हेंबर) दुपारी सादरीकरणासाठी बोलावण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, तांत्रिक बोली लिफाफे उघडण्यात आले असून, पुढील टप्प्यात आर्थिक बोली (फायनान्शियल बिड) उघडली जाणार आहे. या निविदेसाठी आर अँड बी इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रा. लि., पी. गोपीनाथ रेड्डी, अर्बन एन्व्हायरो वेस्ट मॅनेजमेंट लि. आणि कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर लि. या चार कंपन्यांनी आपले प्रस्ताव सादर केले आहेत. महानगरपालिकेने 14 ऑक्टोबर रोजी आयोजित केलेल्या प्री-बिड बैठकीनंतर सात कंपन्यांपैकी चार कंपन्यांनी अंतिम निविदा सादर केली होती. उर्वरित तीन कंपन्यांनी नंतर या शर्यतीतून माघार घेतली. मात्र, तांत्रिक तपासणी पूर्ण न करता थेट सादरीकरणासाठी कंपन्यांना आमंत्रित करण्यात आल्याने या निर्णय प्रक्रियेबाबत काही प्रश्न उपस्थित होत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, बैठकीनंतर संध्याकाळी साडेसात वाजता चारही कंपन्यांना ईमेलद्वारे तातडीने सादरीकरणासाठी बोलावण्यात आले. यामुळे पारदर्शकतेबाबत चर्चा सुरू झाली आहे. पूर्वी अमरावती महानगरपालिका वॉर्ड आणि विभाग-आधारित स्वच्छता करार प्रणाली वापरत होती. काही काळापूर्वी झोन-आधारित प्रणाली लागू करण्यात आली होती. मात्र, आता ती बंद करून संपूर्ण शहरासाठी एकच कंत्राट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या एकत्रित कंत्राटाअंतर्गत एका कंपनीला शहरातील चरा संकलन, वाहतूक आणि कंपोस्ट डेपोपर्यंत पोहोचवण्याची संपूर्ण जबाबदारी देण्यात येईल.महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांच्या माहितीनुसार, तांत्रिक पात्रतेची तपासणी पूर्ण झाल्यानंतर सर्वात कमी बोली लावणार्‍या (‘एल-1’) कंपनीला हे कंत्राट देण्यात येणार आहे. या प्रक्रियेतील पुढील टप्प्यांकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button