बनावट पोलिसांनी 67 वर्षीय वृद्धाला गंडा घातला
राजहिल नगरात 90 हजारांच्या दागिन्यांची फसवणूक

अमरावती /4 नोव्हेंबर – शहरातील राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राजहिल नगर परिसरात बनावट पोलिसांनी एका 67 वर्षीय वृद्ध नागरिकाला फसवून 90 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपींच्या शोधासाठी विशेष पथक तयार केले असून, परिसरातील उउढत फूटेज तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पीडिताचे नाव राजू नानासाहेब मिटकरी (वय 67, रा. खारकर लेआउट) असे आहे. सोमवारी (3 नोव्हेंबर) दुपारी ते पाण्याचे बिल भरण्यासाठी बाहेर पडले असताना ही फसवणूक घडली. वृत्तानुसार, मिटकरी राजहिल नगरातून जात असताना दोन दुचाकीस्वार काळ्या हेल्मेटसह त्यांच्या जवळ आले. स्वतःला पोलिस अधिकारी म्हणून ओळख देत त्यांनी बनावट ओळखपत्र दाखवले. त्यानंतर त्यांनी सोन्याचे दागिने घालून बाहेर फिरणे धोकादायक आहे असे सांगत पीडितावर विश्वास बसवला. दागिने रुमालात बांधून सुरक्षित ठेवा असा सल्ला देत त्यांनी सोन्याची साखळी (15 ग्रॅम), दोन अंगठ्या (5 ग्रॅम प्रत्येकी) आणि ‘ॐ’ लॉकेट घेतले. काही क्षणातच रुमाल परत देत हा सुरक्षित आहे, खिशात ठेवा असे सांगून दोघेही पसार झाले. थोड्याच वेळाने मिटकरी यांनी रुमाल उघडला असता दागिने गायब असल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ राजापेठ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. राजापेठ पोलिसांनी अज्ञात दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविला असून, परिसरातील उउढत कॅमेर्यांचे फूटेज तपासून आरोपींचा मागोवा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. लवकरच आरोपींना गजाआड केले जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.




