क्षेत्रफळावर आधारित कर आकारणीमुळे मालमत्ता धारकांना दिलासा

* आ. सुलभा खोडके यांच्या प्रयत्नांना यश

* पालकमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे आणि आयुक्त सौम्या शर्मा यांच्या पुढाकाराचे कौतुक

अमरावती / 4 नोव्हेंबर – शहरातील व्यावसायिक आणि मालमत्ताधारकांसाठी आजचा दिवस दिलासादायक ठरला आहे. महानगरपालिकेने अखेर भाडेआधारित कर प्रणाली रद्द करून शहरात मालमत्तेच्या क्षेत्रफळावर आधारित कर आकारणी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे शहरातील शेकडो व्यावसायिक, इमारतधारक आणि गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामागे आहे आमदार सौ. सुलभा संजय खोडके यांचा सातत्यपूर्ण व ठाम पाठपुरावा. अमरावती महानगरपालिकेकडून यापूर्वी भाडेकरारावर दिलेल्या इमारतींवर प्रत्यक्ष भाड्याच्या उत्पन्नाच्या जवळपास 50 टक्क्यांपर्यंत कर आकारला जात होता. ही प्रणाली अन्यायकारक असल्याचे निदर्शनास आणून आमदार सुलभाताईंनी या विषयावर अनेक बैठकांमधून प्रशासनाचे लक्ष वेधले.आ. खोडके यांनी या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांना सविस्तर पत्र देऊन अमरावतीतही सोलापूर, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरप्रमाणे
समान कर प्रणाली लागू करण्याची मागणी केली होती. त्यांच्या साकारणार्‍या दृष्टिकोनाला दुजोरा देत ना. पवार यांनी महानगरपालिकेला आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. यानंतर पालकमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आमदार सुलभा खोडके यांनी पुन्हा हा विषय मांडला. त्यांनी स्पष्ट सांगितले की – कर प्रणाली नागरिकांसाठी न्याय्य असली पाहिजे; विकासाचा भार कुणावरही अन्यायकारक पद्धतीने पडता कामा नये. त्यावर पालकमंत्र्यांनी मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांना तात्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले. त्यानंतर आयुक्तांनी सर्व कायदेशीर बाबी तपासून कर निर्धारण विभागाची विशेष बैठक घेतली आणि अखेर नव्या ‘क्षेत्रफळ आधारित कर प्रणाली’ला मंजुरी दिली. या निर्णयामुळे आता अमरावती शहरात प्रत्येक मालमत्तेचा कर क्षेत्रफळानुसार समान आणि पारदर्शक पद्धतीने ठरवला जाईल. यामुळे नागरिकांचा आर्थिक ताण कमी होईल आणि शहरातील गुंतवणुकीस नवी गती मिळेल.या ऐतिहासिक निर्णयाबद्दल आमदार सौ. सुलभा खोडके यांनी पालकमंत्री ना. बावनकुळे आणि मनपा आयुक्त सौ. शर्मा चांडक यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. शहराचा विकास आणि नागरिकांचा दिलासा – हे दोन्ही साध्य व्हावे, हीच माझी भूमिका आहे.

संबंधित बातम्या

Back to top button