अमरावती गॅस डीलर असोसिएशनकडून जिलाधिकार्‍यांना निवेदन

सेवा शुल्कात वाढ करण्याची मागणी

अमरावती /4 नोव्हेंबर – वर्ष 2019 पर्यंत देशातील एलपीजी वितरकांना दरवर्षी होम डिलिव्हरी आणि प्रशासकीय शुल्कात वाढ दिली जात होती. मात्र, कोरोना काळापासून आजतागायत केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने एक रुपयाचीही वाढ केलेली नाही. या पार्श्वभूमीवर वितरकांनी इशारा दिला आहे की, मागील सहा वर्षांपासून सेवा शुल्कात वाढ न झाल्याने ते सेवा शुल्क 75 रुपये करण्याची मागणी करत आहेत. जर ही मागणी मान्य केली नाही, तर 6 नोव्हेंबर रोजी सर्व एलपीजी वितरक अकाऊंटमध्ये पैसे जमा करणार नाहीत आणि इंडेंटही प्लेस करणार नाहीत, असा इशारा देण्यात आला आहे. ही मागणी नमूद करणारे निवेदन 3 नोव्हेंबर रोजी अमरावती गॅस डीलर असोसिएशनने जिलाधिकार्यांमार्फत केंद्र सरकारच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाकडे पाठवले आहे. निवेदनात म्हटले आहे की, शासनाने गठित केलेल्या समितीच्या शिफारशीप्रमाणे एलपीजी वितरकांच्या सेवा शुल्कात वाढ करण्यात आलेली नाही. वर्ष 2019 पर्यंत दरवर्षी वितरकांना प्रशासकीय व डिलिव्हरी शुल्कात वाढ दिली जात होती, परंतु कोरोना काळानंतर ती बंद करण्यात आली. सरकारी सेवक व तेल कंपन्यांचे अधिकारी दर जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई भत्त्याचा लाभ घेतात, मग एलपीजी वितरकांच्या शुल्कात वाढ का होत नाही, असा प्रश्नही निवेदनात उपस्थित केला आहे. राष्ट्रीय एलपीजी वितरक संघाच्या अध्यक्ष, पदाधिकारी, राज्याध्यक्ष व जिल्हाध्यक्ष यांच्यासोबत 14 ऑक्टोबर रोजी झालेल्या झूम बैठकीत होम डिलिव्हरी व प्रशासकीय शुल्कात 75 रुपयांची वाढ करण्याच्या मागणीवर टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्या टप्प्यात 24 ऑक्टोबर रोजी काळा फिता लावून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. 29 ऑक्टोबर रोजी जिल्हा मुख्यालयांसमोर संध्याकाळी मोमबत्ती आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने जर वितरकांची एक सूत्रीय मागणी मान्य केली नाही, तर पुढील काळात व्यवसाय बंद करून अनिश्चितकालीन संप करण्याचा इशारा देण्यात आला आहे.निवेदन देताना उपस्थित अमरावती गॅस डीलर असोसिएशनचे अध्यक्ष संजय देशमुख, सचिव अखिलेश यादव, तसेच राजेश डागा, विलास तायवाडे, बबलू शेखावत, निखिल भन्साली, किशोर भांबुरकर, सागर राठी, जितेश दम्मानी, यश राऊत, कपिल खेरडे, गजू राजगुरे, असलम सिद्दीकी, सुनील मालवे, उमेश इंगळे, मुख्रफदल हसनजी, जयस्वाल, प्रवीण वाडेकर, गिरीश राठी, ओमप्रकाश परतानी, निलेश रडके, मनोज कटारिया, जितेंद्र गोरे, कमलेश इवनाते, सतीश परदेशी, भावेश बावनकुळे, सारंग देशमुख, निखिल इंगळे, उमेश चव्हाण, रुपेश चौबे, मयुरी पटोकार, दीपक खंडारे व अन्य सदस्य उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button