भाजप नेत्या नवनीत राणा नागपूरच्या रुग्णालयात दाखल

डॉक्टरांनी दिला 25 दिवस बेडरेस्टचा सल्ला

अमरावती / 2 नोव्हेंबर – भाजप नेत्या आणि अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांना पायाला झालेल्या गाठीमुळे नागपूरमधील नरेंद्रनगर येथील सुयोग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान झालेल्या जुन्या इजेचा त्रास पुन्हा उद्भवल्याने त्यांना उपचारासाठी तातडीने दाखल करण्यात आलं. सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. गिरीश मोटवानी यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून सध्या त्या उपचार घेत आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील 25 दिवस त्यांना पूर्ण बेडरेस्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नवनीत राणा यांच्या पायाला झालेली दुखापत ही लोकसभा निवडणुकीच्या प्रचार काळात झालेल्या फ्रॅक्चरशी संबंधित असल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं आहे. निवडणुकीच्या काळात सतत प्रवास, सभा आणि जनसंपर्क मोहिमेमुळे त्या इजेला पूर्ण विश्रांती मिळाली नव्हती. त्यामुळे आता त्याच ठिकाणी सूज आणि गाठ तयार झाली आहे. अमरावती येथील नामांकित ऑर्थोपेडिक तज्ञ डॉ. शाम राठी यांच्या सल्ल्यानुसार नवनीत राणा यांना नागपूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
रुग्णालयाबाहेर तगडा पोलीस बंदोबस्त-दरम्यान, नवनीत राणा यांना काही दिवसांपूर्वी धमक्या मिळाल्याचा मुद्दा चर्चेत आला होता. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांकडे सोपवण्यात आली आहे. रुग्णालय परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला असून केवळ त्यांच्या जवळच्या व्यक्तींनाच भेटण्याची परवानगी दिली जात आहे. पोलिसांकडून सर्वोतोपरी काळजी घेतली जात आहे. कारण नवनीत राणा यांना नुकत्याच काही दिवसांत दोनवेळा धमकी देण्यात आली आहे. सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून डॉक्टरांनी योग्य उपचार आणि पूर्ण विश्रांती घेतल्यास त्या लवकरच पुन्हा तंदुरुस्त होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button