सिगारेट चोरी प्रकरणातील एक आरोपी जेरबंद
साथीदार फरार, नागपुरी गेट पोलीसांची कारवाई

* चोरीचा 38,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त
अमरावती /28 ऑक्टोबर -शहरातील नागपुरी गेट परिसरात झालेल्या सिगारेट चोरी प्रकरणाचा तपास वेगाने उलगडत असून, पोलिसांनी एका आरोपीस अटक करण्यात यश मिळवले आहे. या प्रकरणात गुन्हा क्रमांक 518/25 अंतर्गत कलम 305 (-) बी.एन.एस. नुसार कारवाई करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, शेख तोफिक शेख रफिक (वय 24 वर्षे, रा. पठाण चौक, अमरावती) या आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चौकशीत त्याने सदर चोरीचा गुन्हा आपल्या साथीदार सैय्यद आबिद (फरार) यांच्या मदतीने केल्याचे कबूल केले आहे. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीकडून चोरी गेलेला मुद्देमाल, एकूण किंमत रु. 38,400/- इतका, जप्त केला आहे. तसेच आरोपीने उर्वरित सिगारेटचा माल शेख फहीम शेख रफिक (रा. कमेला ग्राउंड, अमरावती) याला विकल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांनी शेख फहीमचा शोध घेतला असता तो घरात न सापडल्याने सध्या तो फरार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणातील जप्त केलेला माल तसेच अटक केलेला आरोपी यास पुढील तपासासाठी नागपुरी गेट पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून, फरार आरोपी व माल विकत घेणाऱ्याच्या शोधासाठी पोलिसांचे पथक सक्रिय झाले आहे.




