हायवेवर कार उलटली, आग लागल्याने राख रांगोळी
वरूडा गावाजवळ दुर्घटना

* सुदैवाने गाडीतील पाच बचावले
अमरावती /27 ऑक्टोबर – रविवारी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास बडनेरा जवळील वरुडा गावाजवळ एक्सप्रेस हायवेवर अकोल्याहून अमरावतीकडे येणाऱ्या हुंडई आय10 कारचा भीषण अपघात झाला. कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजक तोडून दुसऱ्या बाजूला गेली आणि उलटली. त्यानंतर कारला आग लागली आणि ती पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने, कारमधील पाच जणांना वेळेत बाहेर निघण्यात यश आले, त्यामुळे त्यांचे प्राण वाचले, परंतु त्यापैकी दोघे गंभीर जखमी झाले.
प्राप्त माहितीनुसार, कार कोसळताना झालेला स्फोट इतका जोरदार होता की आजूबाजूचे नागरिक जागे झाले आणि तात्काळ मदतीसाठी घटनास्थळी धावले. माहिती मिळताच अग्निशमन विभाग आणि 108 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. सुमारे एका तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली, मात्र तोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती. जखमींना रात्री साडेअकराच्या सुमारास अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, कारमधील सर्व प्रवासी अमरावती येथील रहिवासी असून वाढदिवस साजरा करण्यासाठी सिंधू ढाब्यावर गेले होते आणि परत येत असताना वरुडा गावाजवळ हा अपघात झाला.




