शहरातील मंगलधाम कॉलनीत बिबट्या आढळल्याने खळबळ

वनविभागाच्या कर्मचार्‍यांची डोकेदुखी वाढली

* परिसरातील नागरिकांमध्ये पसरली दहशत

अमरावती /26 ऑक्टोबर –  शहरात नेहमीच बिबट्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. गेल्या आठवड्यात कांतानगर परिसरात बिबट्या आढळला होता. यानंतर शनिवारी पुन्हा नवीन बायपासवरील मंगलधाम कॉलनीत एका घरामध्ये बिबट शिरल्याची घटना सकाळी निदर्शनास आली. सुतारकाम करणारा कुशल नावाचा तरुण मंगलधाम कॉलनी येथे राहतो. शनिवारी तो मंदिरात गेला होता आणि परत आल्यानंतर त्याला घरामध्ये बिबट शिरल्याचे आढळले.

कुशल हा माजी उपमहापौर संध्याताई टिकले यांचा मुलगा कुणाल यांच्या बांधकाम साईटवर कामाला असल्याने त्याने तत्काळ कुणाल टिकले आणि संध्याताई टिकले यांना फोनवरून ही माहिती दिली. त्यांनी लगेच वनअधिकाऱ्यांशी संपर्क साधला. अधिकारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि ड्रोनच्या मदतीने शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु बिबट आणि तिची दोन पिल्ले कुठेही सापडली नाहीत. मात्र, संबंधित बिबट आणि त्याची दोन पिल्ले कुशलच्या सीसीटीव्ही कॅमेरात रात्री 1.54 वाजता कैद झाल्याचे आढळले. बिबट आणि त्याची पिल्ले कंपाऊंडच्या आत बसलेली दिसली आणि नंतर परत जाताना ती एका दुसऱ्या घराच्या कॅमेरातही दिसली.

या घटनेनंतर वनअधिकाऱ्यांनी परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे, एकटे फिरू नये आणि रात्री घराबाहेर जाणे टाळावे, असा इशारा दिला आहे. बिबट्या मंगलधाम परिसरात शिरल्याची बातमी पसरताच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button