अॅड. प्रशांत देशपांडे यांची बिनविरोध निवड
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या उपाध्यक्ष पदी

अमरावती / 19 ऑक्टोबर – अध्यक्ष पदासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यात सरळ लढत असून, येत्या पाच वर्षांसाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. नामांकन परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी फक्त उपाध्यक्ष पदासाठी निर्विरोध निवड झाली आहे. अध्यक्ष पदासहित इतर संपूर्ण कार्यकारिणीची निवडणूक 2 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे.
अमरावती क्रीडा क्षेत्रातीलच नव्हे, तर सामाजिक, राजकीय आणि कला क्षेत्रातील दबदबा असणारे, जगप्रसिद्ध श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष आणि अमरावती जिल्हा वकील संघाचे माजी अध्यक्ष डॉ. प्रशांत देशपांडे सध्या ऑलिम्पिक संघटनेच्या मावळत्या कार्यकारिणीत सहसचिव म्हणून कार्यरत आहेत. आपल्या अभ्यासू आणि मनमिळावू स्वभावामुळे ते संपूर्ण राज्यभरातील क्रीडाक्षेत्रात सुप्रसिद्ध आहेत.
क्रीडाक्षेत्रातील या सर्वोच्च संघटनेत महत्त्वाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी, डॉ. देशपांडे यांच्यावर महाराष्ट्र राज्य धनुर्विद्या संघटनेच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी अनेक वर्षांपासून आहे. नुकतेच ते राज्य व्हॉलिबॉल संघटनेचे सुद्धा बिनविरोध उपाध्यक्ष म्हणून निर्वाचित झाले आहेत. अमरावती जिल्ह्यातील अनेक क्रीडा संघटनांची महत्त्वाची पदं डॉ. देशपांडे सांभाळत आहेत आणि खेळाडूंना सर्वप्रकारची मदत व मार्गदर्शन करण्यासाठी नेहमी तत्पर असतात. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे महासचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांचे सह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ. प्रशांत देशपांडे यांचे अभिनंदन केले आहे.




