25 तास डोसे बनवून मोडला स्वत:चाच रेकॉर्ड
शेफ विष्णू मनोहर यांचा अमरावतीत विेशविक्रम

* उपक्रम अनुभवण्यासाठी अमरावतीकरांची मोठी गर्दी
* एमआयडीसी मार्गावरील गुणवंत लॉनवर उपक्रम
अमरावती / 19 ऑक्टोबर : प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी गेल्या वर्षी नागपूर येथे केलेला सलग 24 तास डोसे बनविण्याचा स्वत:चा विक्रम मोडला असून, अमरावतीत त्यांनी ‘न थांबता 25 तास’ डोसे तयार करण्याच्या नवीन विक्रमाला गवसणी घातली. शनिवारी सकाळी 7 वाजेपासून त्यांनी डोसे बनवायला सुरुवात केली आणि रविवारी सकाळी 8 वाजता हा उपक्रम पूर्ण झाला. उपस्थितांनी टाळ्या वाजवून विष्णू मनोहर यांचे कौतुक केले. हा अनुभव घेण्यासाठी अमरावतीकरांनी एमआयडीसी मार्गावरील गुणवंत लॉनवरील ‘विष्णूजी की रसोई’ येथे मोठी गर्दी केली होती.
25 तासांमध्ये विष्णू मनोहर यांनी तब्बल 15,773 डोसे तयार केले. या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया या संस्थांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत करण्यात आली. आजपर्यंत विष्णू मनोहर यांच्या नावावर तीस विक्रमांची नोंद आहे आणि अमरावतीत नोंदवलेला हा त्यांचा एकतिसावा विक्रम आहे. पुढील विक्रम अमेरिकेत नोंदविण्याचा मानस असून, ते तिथे सलग 26 तास डोसे बनवणार आहेत. शनिवारी सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झालेल्या उपक्रमात पहिल्या दोन तासांत सुमारे 750 डोसे तयार झाले. पहिला तयार झालेला डोसा शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात पाठवण्यात आला. या विक्रमासाठी विष्णू मनोहर यांना सुमारे 500 किलो उडीद डाळ, तांदळाचे बॅटर आणि 100 किलो चटणी लागली. तीन तव्यांवर एकाचवेळी डोसे बनवले गेले. उपक्रमात समोरील मंचावर गीत-संगीत कार्यक्रमाचे सादरीकरणही झाले.
सलग 25 तास डोसे बनवण्याच्या या विक्रमाच्या निमित्ताने अमरावतीकरांनी शनिवारी सकाळपासूनच गर्दी केली होती. विशेष म्हणजे येथे तयार होणारे डोसे निःशुल्क चाखायला मिळत होते आणि खवय्ये रांगा लावून डोस्यांचा आस्वाद घेत होते. दिवसभर आणि रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत चवदार डोशांची मेजवानी अमरावतीकरांना मिळाली. विष्णू मनोहर यांनी सांगितले की, रात्री एक-दोन वाजेपर्यंत सुमारे 300 अमरावतीकर त्यांच्या उत्साह वाढविण्यासाठी हजर होते. नवीन विक्रम नोंदवणे हा त्यांच्या दृष्टीने आनंदाचा क्षण आहे, असे त्यांनी व्यक्त केले.




