रहाटगाव बनावट नोट प्रकरणात आणखी दोन जणांना अटक

57 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त; आतापर्यंत पाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात

* मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू; नांदगावपेठ पोलिसांची सलग कारवाइ

नांदगाव पेठ/19 ऑक्टोबर  – रहाटगाव परिसरात उघडकीस आलेल्या बनावट चलनी नोटांच्या प्रकरणात नांदगावपेठ पोलिसांनी रविवारी आणखी दोन संशयितांना अटक करून 57 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. आतापर्यंत या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली असून, या रॅकेटचा मास्टरमाइंड अद्याप फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यासाठी तपास वेगाने सुरू आहे.

अटक करण्यात आलेले आरोपी आदित्य रामेकर (रा. समर्थवाडी, रहाटगाव) आणि यश सतीश बर्वे (रा. दत्तवाडी, रहाटगाव) हे असून, आदित्य रामेकर याच्याकडून तब्बल 48 हजार रुपयांच्या, तर यश बर्वे याच्याकडून 9 हजार रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. यापूर्वी पोलिसांनी तीन आरोपींना अटक करून काही प्रमाणात बनावट चलनी नोटा जप्त केल्या होत्या. या सलग कारवायांमुळे रहाटगाव परिसरातील बनावट नोटांच्या अवैध व्यवहारांवर पोलिसांनी मोठा आळा घातला आहे.

प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, या आरोपींनी बनावट नोटा स्थानिक बाजारात आणि किरकोळ व्यवहारांमध्ये वापरून चलनात आणण्याचा प्रयत्न केला होता. या कारवायांनंतर बनावट नोटा बनविणार्‍यांचे धाबे दणाणले असून, मोठे रॅकेट समोर येण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, उपायुक्त गणेश शिंदे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त कैलास पुंडकर (फ्रेझरपुरा विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली, उपनिरीक्षक दिनेश दहातोंडे यांच्या नेतृत्वात पार पडली. या पथकात पोहेकॉ राजाभाऊ राऊत, पोकॉ राजीक खान, पोकॉ निलेश साविकार, पोकॉ राजा सय्यद, पोकॉ वैभव तिखीले आणि पोकॉ अमित ढोले यांनी विशेष परिश्रम घेतले.

या प्रभावी आणि सलग कारवायांमुळे शहरात चलनात असलेल्या बनावट नोटांच्या प्रसारावर आळा बसला असून, पोलिस प्रत्येक हालचालीवर बारकाईने नजर ठेवत आहेत. या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू असून, बनावट नोटा नेमक्या कोठे आणि कशा पद्धतीने तयार केल्या जातात याचा सखोल तपास सुरू आहे. प्राथमिक चौकशीतून असे संकेत मिळाले आहेत की या मागे एक संगठित टोळी कार्यरत आहे. पोलिस या प्रकरणी गंभीरतेने तपास करत असून, लवकरच या रॅकेटचा मास्टरमाइंड हाती लागेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

संबंधित बातम्या

Back to top button