उधारीच्या पैशांवरून खुनाचा प्रयत्न
सेंटरिंग कामगारावर दोघांनी केले चाकूने सपासप वार

अमरावती /18 ऑक्टोबर – जेवडनगर परिसरात राहणारा 42 वर्षीय सेंटरिंग मजूर युवराज तांबट याला उधारीचे पैसे परत केले नाहीत म्हणून जिवे मारण्याच्या उद्देशाने दोघांनी चाकूने वार करून गंभीर जखमी केले. तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी गुड्डू रोंढे (35, मंगलधाम कॉलनी) आणि राहुल शिवप्रसाद पटेल (26, जेवडनगर) यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम 109, 352 आणि 3(5) अंतर्गत हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, युवराज तांबट यांच्या पत्नीने काही दिवसांपूर्वी गुड्डू रोंढे यांच्याकडून पैसे उधार घेतले होते, मात्र त्या पैशांची परतफेड होऊ शकली नाही. त्यामुळे गुड्डू रोंढे सतत युवराज तांबट यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत होते. शुक्रवारी सकाळी सुमारास दहा वाजता युवराज तांबट हे न्यू गणेश कॉलनी परिसरात सेंटरिंगच्या कामासाठी आले असता गुड्डू रोंढे आणि राहुल पटेल देखील तेथे पोहोचले. त्यांनी उधारीच्या पैशावरून वाद घालत युवराज तांबट यांच्यावर चाकूने सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या युवराज तांबट यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती युवराज तांबट यांच्यासोबत काम करणाऱ्या एका कामगाराने त्यांच्या पत्नीला दिली. त्यानंतर युवराज यांच्या पत्नीने राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या आधारे राजापेठ पोलिसांनी बीएनएसच्या कलम 109, 352 आणि 3(5) अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करून पुढील चौकशी सुरू केली आहे.




