अप्पर वर्धा धरणात बुडून 13 वर्षीय मुलाचा मृत्यू

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पथकाला जयचा मृतदेह नदीपात्रातून काढण्यात यश

मोर्शी /17 ऑक्टोबर : मोर्शी येथून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या सिंभोरा येथील अप्पर वर्धा धरणात पोहण्यासाठी गेलेल्या एका तेरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना आज दि. 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मृतक मुलाचे नाव जय मुकेश मनोटे (वय 13 वर्षे, रा. सिंभोरा) असे आहे. प्राप्त माहितीनुसार, सिंभोरा येथील जय मुकेश मनोटे व त्याचे दोन मित्र अप्पर वर्धा धरणाच्या नदीपात्रात पोहण्यासाठी उतरले होते. त्यापैकी जय मनोटे हा पोहत असताना पाण्यात बुडाला आणि वर आला नाही. हे पाहून त्याच्यासोबत असलेले मित्र घाबरून गावात परतले आणि त्यांनी घडलेली घटना परिसरात सांगितली. याबाबतची माहिती तत्काळ नायब तहसीलदार चारुदत्त पाटील यांना देण्यात आली. त्यांनी ही माहिती नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती यांना कळविली. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या आदेशानुसार तसेच निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शोध व बचाव पथक घटनास्थळी दुपारी 3:40 वाजताच्या सुमारास पोहोचले आणि तात्काळ शोधकार्य सुरू केले. रेस्क्यू टीमने घटनास्थळी पाहणी करून गळ, रिंग हुकच्या साहाय्याने शर्थीचे प्रयत्न केले व अवघ्या 30 मिनिटांत जयचा मृतदेह नदीबाहेर काढण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता रवाना केला. या शोधकार्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. आपत्कालीन बचाव टीममध्ये गजानन वाडेकर, सचिन धरमकर, विशाल निमकर, आकाश निमकर, सुमित बांबल, अर्जुन सुंदरडे, गणेश जाधव तसेच मोर्शी येथील जीवन सेतू जलमित्र आपत्ती बचाव पथकाचे प्रियांशू तायवाडे, विवेक सावरकर, श्याम भलावी, राज कुरवाडे आणि सागर तायडे यांचा समावेश होता. या कार्यासाठी महसूल तसेच पोलीस प्रशासनाचेही सहकार्य लाभले.

संबंधित बातम्या

Back to top button