सरकारी सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू करा
खा.बळवंत वानखडे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

अमरावती / 15 ऑक्टोंबर – यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन उत्पादनात लक्षणीय घट झाली असूनही बाजारात सोयाबीनला कमी भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात हमी भाव मिळण्याची अपेक्षा आहे. खासदार बळवंत वानखडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून जिल्ह्यात तातडीने सरकारी सोयाबीन खरेदी केंद्र स्थापन करण्याची मागणी केली आहे. सध्या जिल्ह्यातील शेतकर्यांची परिस्थिती बिकट असून खासगी बाजारात सोयाबीनला प्रति क्विंटल फक्त 3,000 ते 4,000 रुपये भाव मिळत आहे, तर केंद्र सरकारने जाहीर केलेला हमी भाव 5,328 रुपये प्रति क्विंटल आहे. हमी भाव मिळविण्यासाठी सरकारी खरेदी केंद्र सुरू करणे अत्यावश्यक आहे, मात्र अद्याप जिल्ह्यात कोणतेही सरकारी खरेदी केंद्र सुरू झालेले नाहीत आणि त्यासंबंधी हालचालही दिसत नाही.
अनेक भागात अतिवृष्टीमुळे शेतकरी सोयाबीनची कापणी करू शकले नाहीत, तर ज्यांनी कापणी केली आहे त्यांचे उत्पादन लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. खाजगी बाजारात मिळणारे कमी भाव लक्षात घेता शेतकर्यांना मजुरीचा खर्चही वसूल होण्याची शक्यता नाही. या परिस्थितीत शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी खासदार बलवंत वानखडे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात मागणी केली आहे की, सरकारने तातडीने सरकारी खरेदी केंद्रे स्थापन करावीत, सोयाबीन उत्पादक शेतकर्यांकडून विक्रीसाठी केंद्रांवर आणलेले सर्व सोयाबीन खरेदी करावे आणि दिवाळीपूर्वी शेतकर्यांना त्यांच्या उत्पादनाचे पैसे मिळावेत यासाठी खरेदी प्रक्रिया जलदगतीने पार पाडावी. खासदार बलवंत वानखडे यांनी स्पष्ट केले की, खरेदी केंद्र सुरू होईपर्यंत त्यांचे प्रयत्न अखंडपणे सुरू राहतील.
* शेतकरी आधीच आर्थिक संकटात
नैसर्गिक आपत्ती आणि कमी बाजारभावामुळे शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत आहेत. यावेळी सरकारने संवेदनशील निर्णय घेऊन शेतकर्यांना दिलासा देणे अपेक्षित आहे. अमरावती जिल्ह्यातील शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने सकारात्मक पावले उचलावीत. – बळवंत वानखडे, खासदार, अमरावती.




