विमान हवेत आणि वैमानिक गांजाच्या नशेत!
एअर इंडियाच्या ‘त्या’ फ्लाईटबाबत धक्कादायक माहिती समोर

नवी दिल्ली/11 ऑगस्ट – काही दिवसांपूर्वी एअर इंडियाच्या फुकेटहून दिल्लीकडे येणारं एआय-2379 हे विमान हवेत असताना अचानक 300 फूट खाली आलं होतं. या घटनेत सुमारे 17 प्रवासी आणि क्रू कर्मचारी जखमी झाले होते. या घटनेनंतर हवाई वाहतूक क्षेत्रात खळबळ उडाली होती. तसेच संबंधित वैमानिकाची वैद्यकीय चाचणीही करण्यात आली होती. दरम्यान, या विमानाच्या वैमानिकाची लॅब टेस्ट पॉझिटिव्ह आली असून, या वैमानिकाने गांजाची नशा केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना घडल्यानंतर एअर इंडियाच्या या विमानातीन दोन्ही वैमानिकांची सायकोएटिव्ह सब्स्टेंस स्क्रीनिंग करण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सहवैमानिकाच्या सुरुवातीच्या तपाणसीमध्ये अशी कोणतीही बाब समोर आलीनव्हती. मात्र पायलट इन कमांडच्या सुरुवातीच्या तपासणीत अशा काही बाबी दिसल्या होत्या ज्यामुळे अधिक सखोल तपासणीची आवश्यकता भासली होती. त्यानंतर पायलट इन कमांडचे नमुने सँपल कन्फर्मेटरी टेस्टसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या तपासणीत या वैमानिकाच्या नमुन्यांमध्ये गांजाचे अंश आढळून आले. दरम्यान,आता या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत दोन्ही वैमानिकांना फ्लाईंग रोस्टरमधून हटवण्यात आले आहे. त्यामुळे या वैमानिकांना चौकशी पूर्ण होईपर्यंत विमान उडवण्याची ड्युटी लावण्यात येणार नाही. तसेच आता पुढील कारवाई तपास पूर्ण झाल्यानंतर आणि संबंधित अधिकार्यांच्या निष्कर्षांच्या आधारावर होणार आहे. 4 ऑगस्ट रोजी एअर इंडियाचं विमान थायलंडमधील फुकेट येथून दिल्लीला येत असताना अचानक टर्बुलन्स झालं होतं. त्यामुळे विमानातील 13 प्रवासी आणि 4 क्रू कर्मचारी जखमी झाले होते.




