धनतेरसच्या मुहुर्तावर 1545 किलो चांदीची डिलिव्हरी!
वाढत्या दरानंतरही ग्राहकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

* सराफा व आभूषणांच्या प्रतिष्ठाणांमध्ये गर्दी
अमरावती / 15 ऑक्टोंबर – पुष्य नक्षत्राच्या निमित्ताने बुधवारी धनतेरससाठी सराफा बाजारात, विशेषतः दागिन्यांच्या शोरूममध्ये दोन्ही मौल्यवान धातूंसाठी मोठ्या प्रमाणात बुकिंग करण्यात येत आहे. बुधवारी सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 1,31,500 रुपये इतके होते, तर चांदीच्या किमतीत सातत्याने वाढ होत असून प्रति किलोग्रॅम 1,90,000 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. सराफा बाजारातील प्रमुख व्यापार्यांशी झालेल्या चर्चेनुसार, बुकिंग केलेल्या दागिण्यांची डिलिव्हरी आणि चांदीच्या वस्तूंचे वितरण मंगळवारी सुरू झाले असून, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना दीड टनांहून अधिक चांदीच्या पेट्या पोहोचवण्यात आल्या. सातत्याने वाढणार्या किमतींमुळे नागरिकांनी पुष्य नक्षत्राच्या शुभमुहूर्तावर चांदी खरेदी केली, तर काहींनी धनतेरससाठी दागिन्यांची बुकिंग केली. तयार वस्तूंपेक्षा कच्च्या चांदीला मोठी मागणी आहे. दिवाळीनंतर मोठ्या प्रमाणात बुकिंग आणि डिलिव्हरी अपेक्षित आहे. अमरावतीतील एका प्रसिद्ध ज्वेलर्सने सांगितले की, चांदीची किंमत प्रति किलो 1,77,000 वरून 1,92,000 रुपयांपर्यंत वाढली असली तरी गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात बुकिंग करत आहेत. सर्व दागिन्यांच्या शोरूममध्ये आगाऊ पैसे आणि रोख रक्कम घेतली जात आहे. एका प्रमुख ज्वेलरी शॉपच्या संचालकाने सांगितले की, विक्रेते आणि खरेदीदार दोघेही दिवाळीनंतर प्रत्यक्ष डिलिव्हरीसाठी सहमत आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, 21, 51 किंवा 101 ग्रॅमची डिलिव्हरी धनत्रयोदशीला करण्यात येईल, कारण तो शुभ वेळ मानला जातो, तर उर्वरित मोठ्या प्रमाणात डिलिव्हरी दिवाळीनंतर होणार असून खरेदीदारांना त्याची माहिती दिली जाईल.




