लालखडीजवळील प्लास्टिकच्या गोदामाला आग
कचर्याच्या जळत्या ठिणगीमुळे घडली दुर्घटना

*अग्निशमन दलाच्या गाड्यांचे आगीवर नियंत्रण
* लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक
अमरावती / 15 ऑक्टोंबर – स्थानिक लालखडी-नवसारी रिंग रोडवरील एका प्लास्टिक गोदामात बुधवारी अचानक आग लागली. तिथे साठवलेले प्लास्टिकचे साहित्य काही वेळातच जळून खाक झाले. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन ते तीन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि मोठ्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. तोपर्यंत अंदाजे चार लाख रुपयांचा माल जळून खाक झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, लालखडी-नवसारी रिंग रोडवरील ‘ताज गोडाउन’ नावाच्या प्लास्टिक गोदामाचे मालक सुफियान नावाचे एक व्यक्ती आहेत. आज सकाळी काही लोक या गोदामाजवळ कचरा जाळत होते आणि जळत्या कचर्यातून निघालेल्या ठिणगीमुळे गोदामात आग लागली. आग वेगाने वाढत गेली आणि प्लास्टिक उपकरणे जळून खाक झाली. माहिती मिळताच महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ अग्निशमन गाड्यांसह घटनास्थळी पोहोचले आणि दीड ते दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.




