विरोधक आतापासूनच पराभूत मानसिकतेत
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

नागपूर / 14 ऑक्टोंबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतचोरीचा मुद्दा जोर धरला होता, आणि आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही घोळ उघडकीस येत आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा मतदारसंघातील वानाडोंगरी नगरपंचायतीच्या मतदार यादीत एकाच पत्त्यावर 200 मतदारांची नोंदणी झाल्याचे उघड झाले आहे. अशी स्थिती राज्यभरात कमी-अधिक प्रमाणात आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने या संदर्भात निवडणूक आयोगाला भेट दिली. यासंदर्भात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, निवडणूक आयोगाकडे जाणे हा विरोधकांचा अधिकार आहे, आणि ते पराभूत मानसिकतेत आहेत. “आक्षेप घेतले तरी काही अडचण नाही, आम्ही आमचे काम करू,” असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. त्यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी विरोधकांच्या आक्षेपाला बाधा न आणता स्वतःचे काम सुरू ठेवण्याचे उद्देश व्यक्त केले. याशिवाय, महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत स्वीकृत सदस्य नियुक्तीसंदर्भात तीन महापालिका सदस्य आणि दोन पंचायत समिती सदस्य नियुक्त करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे पालकमंत्री बावनकुळे यांनी वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
* कोतवालांच्या मागण्यांवर तोडगा 16 ऑक्टोबरला
राज्यातील कोतवालांच्या मागण्यांवर 16 ऑक्टोबरला तोडगा निघणार असल्याच बावनकुळे म्हणाले. 36 दिवसांपासून कोतवालांचे आंदोलन सुरु आहे. राज्यात चतुर्थश्रेणी पदनाम बंद करण्यात आले असल्याने ती मागणी पूर्ण करता येणार नाही. मात्र, कोतवालांच्या इतर न्याय्य मागण्यांचा विचार करून त्या 16 ऑक्टोबरला होणार्या बैठकीत त्यांचे प्रश्न मार्गी लावू, असे ते म्हणाले.




