ढाबा चालक, महिलेस जबर मारहाण
जीवे मारण्याची धमकी

* बडनेरा पोलिसात तक्रार दाखल
अमरावती /12 ऑक्टोबर : बडनेर्यात गुंडांकडून दादागिरी करत महिला व ढाबा चालकाला मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत असून या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील राम मेघे इंजिनियरिंग कॉलेजच्या जवळ असलेल्या अजाबराव पाटील वर्हाडी ढाब्यावर हा प्रकार घडला. येथे बडनेरा येथील गुंड मयूर जगदीश कैथवास आणि त्याच्या सहकाऱ्यांनी ढाबा चालकाला व महिलेला मारहाण केली, तसेच वरिष्ठांकडे तक्रार केल्यास मर्डर करून टाकेल अशी धमकी दिली. दरम्यान, या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. मारहाण झालेल्या ढाबा चालक व महिलेनं पोलिसात तक्रार दाखल केली, तसेच व्हिडिओ बडनेरा ठाणेदारांना सादर केला. मात्र, ठाणेदारांनी आरोपींवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून त्यांच्याविरोधात कोणतीही प्रभावी कारवाई करण्यात आलेली नाही. मयूर कैथवास याच्यावर यापूर्वी हत्या व हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल आहेत, आणि पोलीस आयुक्तांनी त्याचा तडीपारीचा प्रस्ताव मंजूर केला आहे. मात्र ठाणेदार व काही PSI यांच्या संरक्षणामुळे ढाबा चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस आयुक्तांनी याची दखल घेतली का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.




