महापालिकेत आ.संजय खोडके व सुलभा खोडके यांच्या उपस्थितीत आढावा बैठक

विविध विभागांच्या कामकाजावर सखोल चर्चा

* अधिकार्‍यांना तत्काळ कार्यवाहीचे निर्देश

* मनपा क्षेत्रात नागरी सुविधांच्या कामांची तातडीने पुर्तता करा

अमरावती /10 ऑक्टोबर : महानगरपालिका क्षेत्रात शहरीकरण वेगाने वाढत असून, नागरी सुविधांच्या उपलब्धतेसाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. तथापि, त्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे महापालिका प्रशासनासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत आमदार सुलभा खोडके यांनी व्यक्त केले. सर्व यंत्रणांनी समन्वय साधून नागरी सुविधांच्या कामांची तातडीने पूर्तता करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. 10 ऑक्टोबर 2025 रोजी अमरावती महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाचा सखोल आढावा घेण्यासाठी मनपाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीमध्ये महानगरपालिकेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम नेहरू मैदान येथील खुल्या जागेवर करण्याबाबत चर्चा झाली. तसेच श्री अंबादेवी आणि एकविरा देवी मंदिराच्या विकास आराखड्याबाबतही सकारात्मक चर्चा करण्यात आली. या बैठकीला आमदार संजय खोडके, आमदार सुलभा खोडके, महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक, अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख आणि शिल्पा नाईक, उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, योगेश पिठे, नरेंद्र वानखडे, तसेच यश खोडके यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते.बैठकीत महानगरपालिकेतील प्रलंबित कामे, नागरिकांच्या तक्रारी आणि विकास योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी महानगरपालिकेच्या विविध योजना आणि त्यांची अंमलबजावणी याबाबत माहिती दिली. आमदारांनी बांधकाम, शिक्षण, नगररचना, कर, अतिक्रमण, उद्यान, प्रकाश, पशुवैद्यकीय, आरोग्य, तसेच प्रधानमंत्री आवास आणि रमाई आवास योजनांसह विविध विभागांच्या कामांचा आढावा घेतला. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी आणि नागरिकांशी संवाद साधून समस्यांचे निराकरण करण्याच्या सूचना दिल्या.महानगरपालिकेची नूतन प्रशासकीय इमारत बांधकामाच्या अंतिम टप्प्यात असून, तज्ञ आर्किटेक्टकडून आराखडा आणि स्ट्रक्चर डिझाईन लवकर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच या इमारतीच्या उभारणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्याबाबतही चर्चा झाली. श्री अंबादेवी-एकविरा देवी मंदिराला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळविण्यासाठी सादर केलेल्या प्रस्तावाबाबतही आयुक्तांनी माहिती दिली. आमदार खोडके यांनी मंदिर संस्थांशी समन्वय साधून पुढील विकास आराखड्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन संदर्भात मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे येणाऱ्या अडचणींची नोंद घेण्यात आली. नागपूर, छत्रपती संभाजीनगर आदी महानगरपालिकांच्या स्वच्छता कामांचा अभ्यास करून त्यानुसार अमरावतीत प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. मालमत्ता कर हा महापालिकेचा प्रमुख महसूल स्रोत असल्याने त्याची वसुली अधिक सुलभ करणे, तसेच तांत्रिक अडचणी दूर करून नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्याचे निर्देश आमदारांनी दिले.महापालिका शाळांच्या विकासासाठी क्रीडांगण, डिजिटल बोर्ड, वॉटर प्युरिफायर, सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर भौतिक सुविधा उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या. जुन्या शाळांची दुरुस्ती आणि सुधारणा करण्याचेही निर्देश देण्यात आले. उद्यान विभागासाठी आवश्यक यांत्रिकी उपकरणांची उपलब्धता करून विभाग अधिक सक्षम करण्याचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले.शहरात हॉकर्स झोन स्थापन करणे, होर्डिंग नियमन, अतिक्रमण निर्मूलन, भुयारी गटार योजना आणि इतर विकास कामांसाठी समन्वयपूर्वक आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याची गरज असल्याचे आमदारांनी सांगितले. त्यांनी प्रशासनासोबत एक लोकप्रतिनिधी म्हणून सहकार्याचे आश्वासन दिले. या बैठकीला महानगरपालिकेच्या सर्व विभागांचे प्रमुख, अधिकारी, माजी नगरसेवक आणि सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button