प्रो.राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या शिरपेचात मानाचा तुरा
जगविख्यात आय आय एम नागपूर सोबत सामंजस्य करार

अमरावती /10 ऑक्टोबर : इंजिनिअरिंग आणि व्यवस्थापनच्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर शिक्षण व प्रशिक्षण देण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे, उपाध्यक्ष उदय देशमुख, कोषाध्यक्ष प्रा. डॉ. हेमंत देशमुख, सचिव युवराजसिंग चौधरी तसेच कार्यकारी सदस्य नितीन हिवसे, डॉ. पूनमताई चौधरी, श्री. पंकज देशमुख, प्रा. विनय गोहाड आणि प्रा. गजानन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर प्रो. राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटने जगविख्यात आणि आपल्या गुणवत्ता व शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी प्रसिद्ध असलेल्या आय.आय.एम. नागपूरसोबत 9 ऑक्टोबर रोजी सामंजस्य करार केला आहे. हा करार महाविद्यालयाच्या भविष्यातील शैक्षणिक उद्दिष्टांसाठी एक नवा आदर्श ठरणार आहे. या कराराच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना स्टार्टअप, संशोधन, प्रशिक्षण आणि व्यावसायिक संधींचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार असून, यामुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासास मोठी चालना मिळणार आहे आणि त्यांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक फायदे मिळतील.
या कार्यक्रमाला आय.आय.एम. नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मैत्री, संस्थेचे कार्यकारी सदस्य श्री. पंकज देशमुख, प्रा. विनय गोहाड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय ठाकरे, आय.आय.एम. नागपूर इन्फिडचे सीईओ शिवाजी धवड, एमबीए विभाग प्रमुख डॉ. शशिकांत थोरात, महाविद्यालयाचे डीन पब्लिक रिलेशन डॉ. लोभस घडेकर, डॉ. अमोल भगत, डॉ. श्रीकांत हरले आणि प्रा. अनुराधा इंगोले यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
या करारादरम्यान संस्थेची, महाविद्यालयाची तसेच संशोधन आणि पेटंटविषयक माहिती प्राचार्य डॉ. अजय ठाकरे यांनी दिली. या करारामुळे पश्चिम विदर्भात शिक्षण आणि व्यवसायाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नव्या संधींची निर्मिती होणार असून विद्यार्थ्यांना आपले कौशल्य जागतिक पातळीवर सिद्ध करण्यासाठी एक मजबूत व्यासपीठ मिळेल. प्रो. राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट आणि आय.आय.एम. नागपूर यांच्यातील हा सामंजस्य करार एक प्रेरणादायी पाऊल ठरला असून, भविष्यातील शैक्षणिक आणि व्यावसायिक सहकार्याची दिशा निश्चित करणारा आहे.




