जि.प.चा कारभार प्रभारी सीईओंच्या खांद्यावर

पीआरसीसमोर साक्ष देण्यासाठी विभागप्रमुख मुंबईत दाखल

अमरावती /9 ऑक्टोबर : अमरावती जिल्हा परिषदेचा कारभार सध्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) प्रीती देशमुख यांच्या माध्यमातून चालवला जात आहे. पंचायत राज समिती (पीआरसी) समोर साक्ष देण्यासाठी राज्यातील विविध विभागांच्या सचिवांनी जिल्हा परिषदेच्या विभागप्रमुखांना मुंबईत बोलावून घेतले आहे. त्यामुळे सध्या प्रीती देशमुख या एकमेव अधिकारी जिल्हा परिषदेचे प्रशासन सांभाळत आहेत. नियमित सीईओ संजीता महापात्र सुटीवर असल्याने देशमुख यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, 2017-18 या आर्थिक वर्षात पीआरसीने अमरावतीला भेट दिली होती आणि त्यावेळी काही त्रुटी नोंदवल्या होत्या. या त्रुटींबाबतची वास्तविकता संबंधित विभागांच्या सचिवांकडून जाणून घेण्यासाठी या महिन्यात त्यांची साक्ष घेतली जात आहे. राज्य शासनाचे लेखाधिकारी तथा कक्ष अधिकारी नि. वि. रहाटेकर यांनी एका पत्राद्वारे सर्व सचिवांना याबाबत कळवले आहे.

या पार्श्वभूमीवर सर्व विभागांच्या सचिवांनी जिल्हा परिषदेतील अधिकार्‍यांना मुंबईत बोलावले आहे. यात सर्व विभागांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा आणि जलसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता यांचा समावेश आहे. दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांची गर्दी असल्याने रेल्वेचे आरक्षण मिळू शकले नाही, त्यामुळे हे सर्व अधिकारी विशेष वाहनाने मुंबईसाठी रवाना झाले आहेत. दोन दिवसांत तेथील कामे आटोपून ते परत येतील आणि सोमवारपासून आपापल्या मूळ जबाबदारीवर रुजू होतील, अशी अपेक्षा आहे.

सणासुदीचे दिवस असल्याने आणि शेतकरी तसेच शेतमजूर सध्या आपापल्या कामांमध्ये व्यस्त असल्याने जिल्हा परिषदेकडे तक्रारदारांची गर्दी कमी आहे. तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि मतदार याद्या तयार करण्याच्या कार्यक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिक त्यात व्यग्र आहेत. त्यामुळे सध्या जिल्हा परिषदेतील कामकाज सुरळीत सुरू आहे.

संबंधित बातम्या

Back to top button