जिल्हा स्त्री रुग्णालयात 122 पदे भरण्यास शासनाची मान्यता

आ.सुलभा खोडके यांच्या पाठपुराव्याला यश

* उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार

अमरावती /8 ऑक्टोबर : अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठे प्रसूतिगृह असलेल्या जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन) येथे 400 खाटांची नूतन इमारत बांधून तयार असूनही, मनुष्यबळाच्या अभावामुळे ती कार्यान्वित करण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. या संदर्भात आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी पुढाकार घेत शासनाकडे पाठपुरावा केला, त्यानंतर शासनाने जिल्हा स्त्री रुग्णालय, अमरावती येथील 400 खाटांच्या रुग्णालयाकरिता बाह्ययंत्रणेद्वारे मंजूर असलेली 122 पदे त्वरित भरण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे रुग्णालय आता पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार असून, महिला रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा मिळणार आहेत.

आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री ना. अजितदादा पवार आणि सार्वजनिक आरोग्य सेवा व कुटुंब कल्याण मंत्री ना. प्रकाशजी आबिटकर यांचे आभार मानले आहेत. त्यांच्या मागील कार्यकाळातच जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन) येथे 400 खाटांची नूतन इमारत उभारण्यासाठी साधारण 64 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. या अंतर्गत प्रशस्त इमारत, विद्युतीकरण व फर्निचरची कामे पूर्ण करण्यात आली होती.

गेल्या 26 सप्टेंबर 2024 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या हस्ते या 400 खाटांच्या नूतन इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. सुरुवातीला जुन्या इमारतीतील काही विभाग टप्प्याटप्याने नवीन इमारतीत हलविण्याचे काम सुरू होते. मात्र तांत्रिक अडचणी आणि मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे इमारत पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होऊ शकली नव्हती.

आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी 4 जानेवारी 2025 रोजी डफरीन रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या पाठपुराव्यानंतर शासनाने 13 फेब्रुवारी 2025 रोजी निर्णय जारी करून नियमित 43 पदे आणि बाह्ययंत्रणेद्वारे 122 पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यास मान्यता दिली. यामुळे एकूण 255 पदे निश्चित करण्यात आली, त्यापैकी 177 पदे भरली गेली होती. परंतु नर्सिंग, स्वच्छता आणि सुरक्षा रक्षक अशा आवश्यक सेवांशी संबंधित 122 पदांची भरती अद्याप प्रलंबित होती.

या पदांच्या भरतीसंदर्भात आमदार खोडके यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आरोग्यमंत्री प्रकाशजी आबिटकर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर शासनाने बाह्ययंत्रणेद्वारे मंजूर असलेली 122 पदे त्वरित भरण्यास मान्यता दिली आहे.

या निर्णयामुळे डफरीन रुग्णालय आता पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार असून, महिला रुग्णांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा मिळतील. अमरावती जिल्ह्यातीलच नव्हे, तर धारणी-मेळघाटसारख्या दुर्गम भागांमधून आणि मध्यप्रदेश सीमावर्ती भागातूनही महिलांची प्रसूतीसाठी या रुग्णालयात येणारी गर्दी लक्षात घेता हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. आ. सुलभाताई खोडके यांच्या मार्गदर्शनात आणि आरोग्यमंत्री ना. प्रकाशजी आबिटकर यांच्या सहकार्याने येथे तत्पर आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा दिली जात असल्यामुळे जिल्हा स्त्री रुग्णालय, अमरावती हे राज्यातील आरोग्य सेवेच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे, अशी नोंद झाली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button