विद्युत खांबावरुन पडून कंत्राटी कामगाराचा मृत्यू
करजगाव (गांधीघर) येथील हृद्रयद्रावक घटना

वरुड । 8 ऑक्टोबर – येथून जवळच असलेल्या करजगाव (गांधीघर) येथील 31 वर्षीय विज वितरण कंपनीच्या कंत्राटी कामगाराचा विजेच्या धक्क्याने विद्युत खांबावरून पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नुकतीच उघडकीस आली आहे. मृत कामगाराचे नाव डिगांबर देविदास बोबडे (वय 31) असे असून, तो नुकताच विज वितरण कंपनीत कंत्राटी पद्धतीने रुजू झाला होता.
डिगांबर यापूर्वी पुण्यात नोकरी करत होता, मात्र गावाकडे परत जाऊन काही व्यवसाय किंवा स्थानिक नोकरी करावी, या विचाराने तो आपल्या मूळ गावी करजगाव (गांधीघर) येथे आला होता.
घटनेच्या दिवशी म्हणजेच पाच दिवसांपूर्वी दुपारी तीन ते चारच्या दरम्यान डिगांबर हा विज वितरण कंपनीच्या इतर कर्मचार्यांसोबत गावाजवळील शेतशिवारात बंद असलेली वीज दुरुस्त करण्यासाठी गेला होता. त्यावेळी तो विद्युत खांबावर चढला असता अचानक विजेचा तीव्र धक्का बसला आणि तो खांबावरून खाली पडला.
सहकर्मचार्यांनी तातडीने त्याला अमरावतीतील डॉक्टर गोधणे यांच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्याचा सल्ला दिला. तीन दिवस नागपूर येथे उपचार सुरू असताना चौथ्या दिवशी त्याची प्रकृती अचानक बिघडली आणि त्याचा मृत्यू झाला.
डिगांबरचे पार्थिव करजगाव (गांधीघर) येथे आणण्यात आले, जिथे नातेवाईक, मित्रमंडळी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत त्याचा अंत्यसंस्कार पार पडला. डिगांबर अविवाहित होता. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. या घटनेने करजगाव (गांधीघर) परिसरात शोककळा पसरली आहे.




