कारच्या धडकेत युवकाचा मृत्यू

मोर्शी बैतूल मार्गावरील घटना

मोर्शी/ 8 ऑक्टोबर – स्कुटी गाडीला मागाहून जाणाऱ्या एका अज्ञात फोर व्हीलर वाहनाने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एका तीस वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना आज दि. 8 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली. मृतक युवकाचे नाव बंसी जोगीराम सरीयाम (वय 30 वर्ष, रा. गोणापूर, जिल्हा बैतूल) असे आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बंसी जोगीराम सरीयाम हे मोर्शी येथून वरुड मार्गे आपली स्कुटी (क्र. एमएच 27 इ 6309) ने जात असताना हिवरखेड गावाजवळील यावले पेट्रोल पंपासमोर मागाहून येणाऱ्या एका अज्ञात फोर व्हीलर वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेनंतर बंसी रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती मोर्शी पोलिसांना दूरध्वनीवरून प्राप्त झाली.

लगेच मोर्शीचे ठाणेदार राहुल आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण चिंचोले यांनी घटनास्थळी जाऊन जखमी बंसीला उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. अज्ञात वाहन चालकाने भरधाव आणि निष्काळजीपणे वाहन चालवून स्कुटीस्वाराला मागून धडक दिली व घटनास्थळावरून पलायन केले.

बंसीचे प्रेत सेवागृहात ठेवण्यात आले असून, शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. मोर्शीचे ठाणेदार राहुल आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण चिंचोले फरार झालेल्या वाहन आणि त्याच्या चालकाचा शोध घेत आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button