कडवी बाजारात मनपाची धडक कारवाई
चार ट्रक प्लॅस्टिकचा साठा जप्त

* प्लॅस्टिकमुक्त अमरावतीसाठी मनपा सज्ज
अमरावती /7 ऑक्टोबर : अमरावती महानगरपालिकेच्या प्लॅस्टिकमुक्ती अभियानाला गती देण्यासाठी आज कडवी बाजार परिसरात मोठ्या प्रमाणावर धडक तपासणी मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत मनपाच्या पथकाने बंदी घातलेल्या प्लॅस्टिक साहित्याचा चार ट्रक इतका मोठा साठा जप्त केला. महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या आदेशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त सौ. शिल्पा नाईक आणि सहाय्यक आयुक्त अविनाश रघटाटे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभाग व स्वच्छता विभागाच्या संयुक्त पथकाने ही मोहीम हाती घेतली. 7 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळपासूनच मनपाचे पथक कडवी बाजार परिसरात दाखल झाले. तपासणीदरम्यान मोठ्या प्रमाणात बंदी घातलेल्या प्लॅस्टिक पिशव्या, एकदाच वापरायचे कप, प्लेट्स, ग्लासेस आणि अन्य प्लॅस्टिक साहित्य विक्रीसाठी ठेवलेले आढळले. मनपाच्या अधिकार्यांनी त्वरित ती सर्व सामग्री जप्त करून चार ट्रक प्लॅस्टिक साठा जप्त केला व पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली. पूर्वसूचना देऊनही अनेक व्यापारी बंदी घातलेल्या प्लॅस्टिकचा वापर करीत असल्याचे निदर्शनास आल्याने मनपाने ही कठोर कारवाई केली. या मोहिमेत अतिक्रमण निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महानगरपालिका प्रशासनाने व्यापारी व नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन केले आहे की, राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमांनुसार बंदी घातलेले प्लॅस्टिक वापरू नये. प्लॅस्टिकमुक्त अमरावती हे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी स्वयंस्फूर्त सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त सौ. सौम्या शर्मा चांडक यांनी केले आहे.




