गुरुदेव नगरात अल्पवयीन युवतीवर बलात्कार

युवकाविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल

वरुड । 5 ऑक्टोबर – शहरातील रिंग रोड परिसरातील गुरुदेव नगरमधील एका घरामध्ये अल्पवयीन युवतीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली असून युवतीच्या तक्रारीवरुन वरुड पोलिसांनी एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे ज्या परिसरामध्ये ही घटना घडली तो शहरातील गजबजलेला आणि प्रतिष्ठीत परिसर असल्यामुळे या घटनेबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सविस्तर माहितीनुसार, तालुक्यातील ग्रामीण भागातील रहिवाशी असलेली अल्पवयीन युवतीला आकाश कमलेश मतलाने नामक 20 वर्षीय युवक मोटर सायकलवर बसवून गव्हाणकुंड नजीकच्या शेकदरी धरणावर घेऊन गेला व तिचा हात पकडून किस केला व वरुड शहरातील गुरुदेव नगर परिसरातील एका घरामध्ये नेवून तिच्या बलात्कार केला. अशी फिर्यादीच्या तक्रारीवरुन वरुड पोलिसांनी आकाश कमलेश मतलाने (20) रा. वरुड याच्यावर कलम 74, 78 (1), 64 (1) बी.एन.एस. सह कलम 4, 5, 8, 12 पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार अर्जुन ठोसरे यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे. विशेष म्हणजे ज्या घरामध्ये ही घटना घडली ते घर श्रीराव नामक ईसमाचे असून ते एका महिलेला भाडे तत्वावर देण्यात आले आहे. संबंधित महिला ज्या खोलीमध्ये भाड्याने राहात होती, ती खोली आंबटशौकीनांसाठी उपलब्ध करून देत होती आणि त्यांच्याकडून रोख स्वरुपात मोबदला सुध्दा घेत होती, असे त्या परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. परिसरातील नागरिकांनी यासंदर्भात घरमालक श्रीराव यांना माहिती सुध्दा दिली होती, परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे. या खोलीमध्ये आतापर्यंत अनेक वेळा असे प्रकार घडले आहेत, परंतु त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्यामुळे ज्या युवकाने हा प्रकार घडवून आणला, फक्त तोच दोषी नाही तर ज्यांनी त्यांना खोली उपलब्ध करून दिली, त्यांच्याविरुद्ध सुध्दा गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. घटनास्थळाला उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खांडेकर यांच्यासह ठसे तज्ञ टिमने सुध्दा भेट दिली.

संबंधित बातम्या

Back to top button