अमरावती हाफ मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद

राज्यातील तीन हजारावर धावपटूंचा सहभाग

* ठिक ठिकाणी धावपटूंसाठी सुविधा

* विजेत्या स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान

अमरावती /5 ऑक्टोबर : अमरावती मॅरेथॉन असोसिएशनच्या वतीने रविवार, 5 ऑक्टोबर रोजी राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या परिसरातून सकाळी 6 वाजता स्पर्धेला प्रारंभ झाला. विविध गटांसाठी 5 ते 21 किमी अंतराची मर्यादा ठेवण्यात आली होती. मॅरेथॉन मार्गावर 10 वॉटर स्टेशनसह सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या तसेच पोलिस बंदोबस्ताचीही पूर्ण तयारी करण्यात आली होती. यंदाच्या स्पर्धेला तब्बल 3 हजारांपेक्षा अधिक धावपटूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदवला. असोसिएशनने 5 किमी फिटनेस रन, 10 किमी धावणे आणि 21 किमी अर्ध मॅरेथॉन सर्वांसाठी खुली ठेवली होती. धावपटूंचा उत्साह वाढवण्यासाठी दोन ठिकाणी त्यांचे स्वागत तुतारी वाजवून करण्यात आले, तर स्पर्धा सुरू होण्यापूर्वी झुंबा कार्यक्रमही घेण्यात आला. मार्गावरील वॉटर स्टेशन्सवर थंड पाणी, खजूर, चॉकलेट आणि केळी यांची व्यवस्था करण्यात आली होती. 21 किमीच्या मॅरेथॉनचे अंतर शिवाजी डीएड महाविद्यालयापासून सुरू होऊन पंचवटी, वेलकम पॉइंट, बियाणी चौक, गर्ल्स हायस्कूल चौक, गाडगेबाबा मंदिर उड्डाणपूल, कठोरा नाका, पोटे अभियांत्रिकी महाविद्यालय मार्गे परत शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात संपले. विविध गटांतील यशस्वी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी शोध प्रतिष्ठानच्यावतीने स्वागत-रन अमरावती रन आयोजित करण्यात आला होता. शहरातील विविध मार्गांवरून धावणाऱ्या स्पर्धकांचे स्वागत पीडीएमसीच्या शिवाजी महाराज सभागृहाजवळील एनर्जी स्टेशनवर आ. सुलभाताई खोडके यांनी केले. सहभागी धावपटूंना पाणी, एनरजेल आणि केळीचे वाटप करण्यात आले. तत्पूर्वी शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात हाफ मॅरेथॉन स्पर्धेला हिरवी झेंडी दाखवतांना आ. सौ. सुलभाताई खोडके, विधानपरिषद सदस्य आ. संजय खोडके, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अँड. गजानन पुंडकर यांच्यासह मान्यवर आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय धावपटू उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button