चायना मांजा विक्री होत असल्यास त्वरित तक्रार करा

नागपुरीगेटचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक यांचे नागरिकांना आवाहन

अमरावती /5 ऑक्टोबर : शहरात शासनाने बंदी घातल्यानंतरही चायना मांजाची खुलेआम विक्री होत असून या पार्श्वभूमीवर नागपुरीगेट पोलीस निरीक्षक एच.एल. उरलागोंडावर यांनी जनतेस आवाहन केले आहे की आगामी सण-उत्सवामध्ये जर बंदी असलेला चायना मांजा दुकानदाराकडे आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवावे. नागपुरी गेट हद्दीत मागील काही दिवसांत परिसरातील मुले नायलॉन चायना मांजाचा वापर करून पतंग उडवत असून त्यामुळे मांजा झाडांवर, वीज खांबांवर, घरांवर व रस्त्यांवर लटकतो आणि अनेक नागरिकांना किरकोळ दुखापती झाल्याच्या तक्रारी मिळाल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी अधिकारी व बिट अंमलदारांना वेगवेगळ्या भागात पाठवून पालक व प्रतिष्ठित व्यक्तींना समुपदेशन करून शासनाने घातलेली बंदी, पर्यावरण संरक्षण अधिनियम व भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल होऊ शकतो याबाबत जनजागृती केली. यावेळी मुलांकडून एकूण 55 नायलॉन मांजावर चालणाऱ्या चक्र्या जप्त करण्यात आल्या. तसेच परिसरातील मशिदींमधील मौलवींच्या मार्फत जनजागृती करावी असा सल्ला देण्यात आला. पोलीस निरीक्षक उरलागोंडावर यांनी आवाहन केले की नागरिकांनी दुचाकीवर प्रवास करताना हेल्मेट वापरावे, गळ्याभोवती दुपट्टा बांधावा आणि पालकांनी आपल्या मुलांना साध्या धाग्यानेच पतंग उडवायला प्रवृत्त करावे. सामाजिक कार्यकर्त्यांनीही याबाबत जनजागृती करावी. तसेच अमरावती शहरात कुठेही नायलॉन चायना मांजाची विक्री होत असल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी व सहकार्य करावे, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या

Back to top button