नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव
सर्वपक्षीय नेते उपस्थित; प्रस्तावावर एकमताने शिक्का मोर्तब

मुंबई/3 ऑक्टोबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाने नामकरण करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी प्रस्तावाला पाठिंबा दर्शविला. राज्य सरकारने हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला असून ‘दि. बा. पाटील’ हे नाव एकमेव म्हणून केंद्राला सादर केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, पुढील तीन महिन्यांत या नावाची अधिकृत घोषणा केली जाईल. हे नामकरण दि. बा. पाटील यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सार्वजनिक योगदानाला अभिवादन असून त्यांच्या स्मरणार्थ त्यांचा वारसा कायम राहील. विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत राज्य सरकारचा इरादा ठाम असून केंद्र सरकारचाही यात वेगळा विचार नाही. पंतप्रधान मोदी यांनीही राज्य सरकारच्या प्रस्तावानुसार विमानतळास नाव दिले जाईल, असा प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे विमानतळाचे नाव ‘लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे निश्चित करण्यात येईल. प्रवासी वाहतूक सुरू होण्यापूर्वी ड्राय रन कालावधीत तांत्रिक बाबींची तयारी आणि आगाऊ बुकिंग नोंदविण्याचे काम सुरू राहील. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठीचा ठराव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी संमत केला असून राज्य मंत्रिमंडळाने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. तसेच पुणे विमानतळाला जगद्गुरु संत तुकाराम यांचे नाव आणि छत्रपती संभाजीनगर विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यासाठीचे प्रस्ताव देखील केंद्र सरकारकडे पाठवले असून हे तिन्ही प्रस्ताव लवकरच नवीन धोरणानुसार मान्य होणार आहेत. इतर काही राज्यांतील प्रस्तावही मान्यतेसाठी प्रतीक्षेत आहेत.




