अमरावती मनपा क्षेत्रात रमाई आवास योजनेसाठी 28.84 कोटींच्या निधीची मागणी

आ.सुलभा खोडके यांचे सामाजिक न्याय मंत्री ना.संजय सिरसाट यांना पत्र

अमरावती /29 सटेंबर : अमरावती महानगरपालिकेतील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील 2,000 लाभार्थ्यांना दुसऱ्या टप्यातील अनुदान न मिळाल्याने त्यांचे घरकुल अर्धवट राहिले आहेत. वर्ष 2024-25 अंतर्गत रमाई आवास योजनेतील लाभार्थ्यांना दुसरा टप्पा वितरित करण्यासाठी महापालिकेला 28.84 कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. सदर निधी लवकर मंजूर करून योजनेच्या कामांना गती देण्याची मागणी आ. सुलभाताई संजय खोडके यांनी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. संजयजी सिरसाट यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. येत्या 10 दिवसांत अमरावती महापालिका क्षेत्रात रमाई आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 28.84 कोटींचा निधी मंजूर करण्याबाबत मंत्रीमहोदयांनी आश्वासन दिले आहे.

अमरावती महानगर पालिकेने वर्ष 2024-25 मध्ये रमाई आवास योजनेअंतर्गत 2,000 लाभार्थ्यांची यादी मंजूर केली होती. प्रत्येक लाभार्थीस 2,50,000 रुपये लागणार असल्याने 50 कोटींच्या निधीची आवश्यकता होती. आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच वित्त व नियोजन मंत्री ना. अजितदादा पवार यांच्याकडे पाठपुरावा केल्यामुळे मार्च 2025 च्या अर्थसंकल्पातून निधी मंजूर झाला. रमाई आवास योजनेसाठी महापालिकेला टप्याटप्याने निधी मिळत असल्याने एप्रिल 2025 मध्ये पहिल्या हप्त्यात 21.16 कोटींचा निधी वितरित झाला आणि योजनेच्या कामांना गती मिळाली. शहरातील लाभार्थ्यांना आता दुसऱ्या टप्यातील अनुदानाची प्रतीक्षा होती.

आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी अमरावती महापालिका आयुक्तांशी चर्चा करून उर्वरित निधी प्राप्तीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला. महापालिकेकडून पाठविल्यानंतर, खोडके यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू ठेवला आणि राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. संजयजी सिरसाट यांना पत्राद्वारे 28.84 कोटींच्या निधी मंजुरीची मागणी केली. अमरावती शहरातील 2,000 लाभार्थ्यांना प्रथम टप्प्यात 21.16 कोटींचे वाटप झाल्यामुळे घरकुल बांधकाम प्रगतीपथावर आहे, परंतु सध्या पावसाचे वातावरण असल्याने घरकुलाचे बांधकाम अर्धवट राहिले आहे. येत्या दिवाळीत लाभार्थ्यांचा गृहप्रवेश होण्यासाठी दुसऱ्या टप्प्यातील अनुदानाची अत्यंत गरज आहे. मंत्रीमहोदयांनी सकारात्मकता दर्शविली असून येत्या 10 दिवसांत अमरावती महापालिकेला 28.84 कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे.

सदर निधीतून लाभार्थ्यांच्या खात्यात आरटीजीएस प्रणालीद्वारे दुसऱ्या टप्प्यातील अनुदान जमा होणार आहे. शहरी भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील लाभार्थ्यांना हक्काचे घरकुल मिळावे यासाठी आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी महापालिका प्रशासनाशी समन्वय साधून शासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. वर्ष 2024-25 मध्ये 2,000 घरांचे उद्दिष्ट पूर्ण होत असताना अजूनही काही लाभार्थी घरकुलापासून वंचित आहेत. त्यामुळे अमरावती शहरातील एकही घर कच्चे किंवा अधुरे राहू नये, यासाठी रमाई आवास योजनेचा लाभ मिळावा, तसेच पुढील वर्षात नव्याने 500 घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याची मागणी खोडके यांनी सामाजिक न्याय मंत्री ना. संजय सिरसाट यांच्याकडे केली असून, मंत्रीमहोदयांनी यावरही सकारात्मकता दर्शविली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button