एक किलो गांजासह आरोपी अटक
लालखडी परिसरात कारवाई

-नागपुरी गेट पोलिसांची धडक
अमरावती / 30 सप्टेंबर : शहरातील वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तींवर आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासन सातत्याने गस्त घालत असते. त्याचाच एक भाग म्हणून नागपुरी गेट पोलिसांच्या डीबी पथकाने लालखडी परिसरात धडक कारवाई करून एकाला जेरबंद केले आहे. आरोपीकडून तब्बल एक किलो गांजा जप्त करण्यात आला असून या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीला चाप बसला आहे. ही कारवाई 29 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, डीबी पथक गस्त घालत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की, लालखडी येथील सुकली रोड परिसरात एक व्यक्ती गांजाची विक्री करण्यासाठी थांबला आहे. या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तत्काळ सापळा रचला. काही वेळ थांबल्यानंतर संशयित युवक पांढर्या रंगाच्या पिशवीतून काही वस्तू काढून लोकांना विक्री करताना दिसला. त्यानंतर पोलिसांनी चतुराईने त्याला ताब्यात घेतले. तपासणीदरम्यान त्या पिशवीतून एक किलो गांजा आढळला. पोलिसांनी तो मुद्देमाल जप्त करून शरीफ बेग रशीद बेग (वय 30, रा. लालखडी) याला अटक केली.
शहरात अंमली पदार्थांचे प्रमाण वाढू नये, यासाठी पोलिस प्रशासनाने आधीपासूनच विशेष मोहिम हाती घेतली आहे. विशेषतः युवकांमध्ये अंमली पदार्थांचा गैरवापर वाढत असल्याच्या तक्रारी वारंवार येत असल्याने नागपुरी गेट पोलिसांचे हे पथक सतत गस्त घालत असते. याच दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.




