राजेंद्र कॉलनीत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा भंडाफोड

दोन फ्लॅटमध्ये सुरू होता देहव्यापार

-दोन महिला, पाच युवती व ग्राहक ताब्यात
अमरावती / 30 सप्टेंबर : शहरातील फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्‍या राजेंद्र कॉलनीसारख्या प्रतिष्ठित वस्तीत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश शहर गुन्हे शाखेने आज दुपारी केला. घनदाट वस्ती आणि सुशिक्षित वर्गाची उपस्थिती असलेल्या या परिसरात अनेक दिवसांपासून चोरीछुप्या पद्धतीने देहव्यापार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेने धडक छापा टाकून दोन फ्लॅट सील केले. या कारवाईत देहव्यापार चालवणार्‍या दोन महिलांसह पाच युवतींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्यासोबत आलेले ग्राहक देखील पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांना त्यांच्या खबर्‍यामार्फत माहिती मिळाली होती की, राजेंद्र कॉलनीतील एका नामांकित सोसायटीतील दोन फ्लॅटमध्ये काही दिवसांपासून अवैध देहव्यापाराचे अड्डे सुरू आहेत. या माहितीस दुजोरा मिळावा म्हणून गुन्हे शाखेच्या पथकाने आपल्या मर्जीतील व्यक्तीला ग्राहक बनवून त्या ठिकाणी पाठवले. त्यांनी मिळवलेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे आज दुपारी अचानक छापा टाकण्यात आला. या छाप्यामध्ये फ्लॅटमध्ये देहव्यापार चालवणार्‍या दोन महिलांना, या व्यवसायात गुंतलेल्या पाच युवतींना तसेच त्यांच्या तावडीत आलेल्या ग्राहकांना पोलिसांनी अटक केली. पुढील चौकशीसाठी सर्वांना फ्रेजरपुरा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. प्राथमिक तपासात अनेक महत्त्वाची माहिती समोर येत असून, या रॅकेटचा आणखी कुणाशी संबंध आहे का, याचा तपास सुरू आहे.
राजेंद्र कॉलनी हा परिसर शहरातील तुलनेने उच्चवर्गीय वस्ती म्हणून ओळखला जातो. अशा ठिकाणी देहव्यापाराचे अड्डे चालत असल्याचे समोर आल्यानंतर स्थानिक रहिवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे. परिसरातील नागरिकांना याची कल्पना नसल्याने, अचानक पोलिसांची कारवाई पाहून नागरिक अवाक झाले. गुन्हे शाखेच्या वेळेवर केलेल्या या कारवाईमुळे पोलिसांच्या दक्षतेचे कौतुक सर्वत्र होत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button