चिखलदरा नप निवडणूक अजित पवार गट स्वबळावर लढविणार
जिलाध्यक्ष संतोष महात्मे यांची घोषणा

-राजेंद्रसिंह सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली मोहीम
चिखलदरा / 29 सप्टेंबर : चिखलदरा नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीला रंग चढू लागला आहे. पर्यटन नगरीत सर्वच राजकीय पक्ष आपल्या ताकदीचे प्रदर्शन करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात जिलाध्यक्ष संतोष महात्मे यांनी चिखलदरा नगरपालिका निवडणूक राकांपा आपल्या दमावर लढणार असल्याचा ठाम ऐलान केला.
महात्मे यांनी स्पष्ट केले की, या निवडणुकीत पक्षाची धुरा चिखलदरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राजेंद्रसिंह सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली राबवली जाणार आहे. सोमवंशी व त्यांच्या पत्नी दोघांनीही नगराध्यक्ष म्हणून काम केले असून त्यांचा अनुभव व जनसंपर्क राकांपाच्या विजयात मोलाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या मेळाव्यात पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर भर देण्यात आला. शहराध्यक्षपदी आदर्श गजभिये, तर शहर उपाध्यक्षपदी शेख अजीज ऊर्फ अज्जूभाई यांची नियुक्ती करून त्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. या वेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्रसिंह सोमवंशी, माजी नगरसेवक अरुण तायडे, सुनील लादे, तसेच निखिल ठाकरे व रिंकू शुक्ला यांची उपस्थिती होती.
महात्मे यांनी आपल्या भाषणात आत्मविश्वास व्यक्त करताना सांगितले की, सोमवंशींच्या नेतृत्वाखाली राकांपा पुन्हा एकदा चिखलदरा नगरपालिकेची सत्ता मिळवेल. तसेच चिखलदरा शहराचा सर्वांगीण विकास हा पक्षाचा प्राधान्यक्रम असेल. एकंदरित, या मेळाव्यामुळे चिखलदरा नप निवडणुकीत राकांपा आपल्या जोरदार तयारीत असल्याचे स्पष्ट झाले असून स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात झाली आहे.




