हेमंत निंभोरकर अपघात प्रकरणात आरोपीला ‘विशेष वागणूक’?
मोर्शी पोलिसांवर गंभीर आरोप

मोर्शी / 29 सप्टेंबर : मोर्शी-सिंभोरा मार्गावर 27 सप्टेंबर रोजी झालेल्या भीषण अपघातात हेमंत निंभोरकर (लिंगापूर, ता. आष्टी, जि. वर्धा) यांचा मृत्यू झाला. मात्र या प्रकरणात अपघाताला जबाबदार ठरलेल्या आरोपी युवकासह त्याच्या सोबतीच्या युवतीला वाचविण्याचा प्रयत्न मोर्शी पोलिसांनी केला असल्याचा गंभीर आरोप मृतकाचा नातेवाईक सचिन रमेश होले यांनी केला आहे. याबाबत त्यांनी मोर्शी पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार नोंदविली असून, पुढे पोलिस कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शनिवार, 27 सप्टेंबर रोजी दुपारी साडेएक वाजता हेमंत निंभोरकर आपल्या मित्र उमेश गोडबोले याच्यासह दुपहिया वाहनावरून मोर्शीतून आपल्या गावी जात होते. त्याचवेळी समोरून यश शिवराज पवार (22, रा. शेगाव नाका, अमरावती) हा आपल्या महिला मैत्रिणीसोबत दुचाकीवरून येत असताना त्याने हेमंत यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात हेमंत निंभोरकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर उमेश गोडबोले गंभीर जखमी झाले. यश पवार आणि त्याच्या सोबतीची युवती किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
या अपघातानंतर पोलिसांनी जबाबदार आरोपी यश पवार याला आवश्यक ती कारवाई करण्याऐवजी विशेष वागणूक दिली. तक्रारदार सचिन होले यांच्या म्हणण्यानुसार, अपघातानंतर पोलिसांनी यश पवार आणि त्याच्या महिला मैत्रिणीला सरकारी वाहनातून थेट मोर्शी बसस्थानकावर आणून त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केले. याशिवाय त्यांचा वैद्यकीय तपासणी अहवालदेखील करण्यात आला नाही.
आरोपानुसार, यश पवारचे वडील पोलिस विभागात कार्यरत असल्याने पोलिसांनी आरोपीला अटक करण्याऐवजी ‘विशेष ट्रीटमेंट’ दिली. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, न्याय मिळविण्यासाठी पुढील काळात संबंधित नातेवाईक काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




