धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी अमरावतीत मोर्चा
आ. रवी राणा यांना निवेदन

-समाजाच्या हक्कासाठी ठाम भूमिका
अमरावती / 29 सप्टेंबर : धनगर समाज गेल्या अनेक वर्षांपासून अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गात घटनात्मक समावेश असतानाही शासनाने अद्याप त्याबाबत कोणतीही अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे धनगर समाजाला तातडीने एस.टी. प्रवर्गाचे आरक्षण मिळावे, या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी मोर्चे काढले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सकल धनगर समाज अमरावती जिल्ह्याच्या वतीने आमदार रवी राणा यांच्या गंगा सावित्री निवासस्थानी मोर्चा काढून त्यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी आ. रवी राणा यांनी स्पष्ट केले की, मी स्वतः ओबीसी व बहुजन समाजाचा आमदार असून सदैव धनगर समाजाच्या पाठीशी उभा आहे. समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मी सभागृहात ठामपणे मांडून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहीन, असे ते म्हणाले. पुढे बोलताना राणा म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व बहुजन समाजाचे मुख्यमंत्री आहेत. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाप्रमाणेच संविधानाच्या चौकटीत राहून धनगर समाजालाही नक्कीच न्याय मिळवून देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विशेष म्हणजे, शेकडोच्या संख्येने गंगा सावित्री निवासस्थानी आलेल्या धनगर समाजाच्या बांधवांसाठी आ. रवी राणा यांच्या वतीने जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. एवढेच नाही तर स्वतः राणा यांनी मोर्चेकर्यांसोबत बसून जेवण केले. या प्रसंगी धनगर समाजाचे नेते दिलीप एडतकर, आशिष माहोरे, माधव अवघड, अर्चना तालन, प्रदीप अलोने, मिलींद अवघड, प्रेमा लव्हाळे, डॉ. पाथुरडे, साधना मस्के, कल्पना ढोके, नंदा चाफले, मस्के साहेब, ज्ञानेश्वरराव ढोमणे, अरुण बांबल, बाळासाहेब अलोने, रोकडे साहेब, वांगे साहेब, पंकज गोहत्रे, तालन साहेब यांच्यासह असंख्य समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.




